आधी पोलिसांना नडला, नंतर रडला!

तावातावाने वाहतूक पोलिसांसोबत भांडणाऱ्या अरुण सिंगला पोलिसी हिसका दाखवताच तो पोलिसांकडे हात जोडून माफी मागू लागला.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यावर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांसोबत तावातावाने भांडणाऱ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, मात्र पोलिसांच्या कारवाईनंतर तावातावाने भांडणाऱ्याची भीगी बिल्ली झाल्याचे अनेक प्रकार समोर येत आहे. मुलुंड येथे एका घटनेनंतर मीरा रोडमध्ये असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.

नो पार्किंगमध्ये कार उभी, तरी केली दमदाटी!

नो पार्किंगमध्ये वाहन उभे करून, वाहतूक पोलिसांच्या कारवाईनंतर वाहतूक पोलिसांना वर्दी उतरवण्याची धमकी देऊन अंगावर धावून जाणाऱ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली, त्यानंतर मात्र पोलिसांची वर्दी उतरवण्याची भाषा करणारा हा तरुण पोलिसांसमोर झालेल्या चुकीची माफी मागतानाचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. मीरा-भाईंदर वाहतूक शाखेचे पोलिस शिपाई कृष्णत दबडे हे गुरुवारी टोइंग व्हॅनवर कर्तव्य बजावत असतांना मीरा-भाईंदर रोडवर रस्त्याच्या कडेला एक कार नो पार्किंगमध्ये उभी होती. पोलिस शिपाई दबडे यांनी या कारवर वाहतुकीच्या नियमानुसार कारवाई करीत असताना कारचा मालक एक तरुण तावातावाने त्या ठिकाणी आला आणि त्याने पोलिस शिपाई दबडे यांना धक्काबुकी करून ‘तुने मेरे गाडी को जॅमर क्यू लगाया, तेरी वर्दी उतारकर तुझे चिरता हु’ या पद्धतीने या तरुणाने पोलिस शिपाई दबडे यांना धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद होऊन तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

(हेही वाचा : प्रीतम मुंडेंना मंत्रीपद न दिल्याबद्दल काय म्हणाल्या पंकजा ताई?)

पोलिसी हिसक्यानंतर जोडले हात!

मीरा रोड पोलिसानी वाहतूक पोलिस शिपाई दबडे यांची तक्रार दाखल करून घेऊन अरुण सिंग आणि त्याची पत्नी मीना सिंग या दोघांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना पोलिस ठाण्यात आणताच काही वेळापूर्वी तावातावाने वाहतूक पोलिसांसोबत भांडणाऱ्या या पती-पत्नीला पोलिसी हिसका दाखवताच, या दोघांची भीगी बिल्ली होऊन अरुण सिंग हा पोलिसांकडे हात जोडून माफी मागू लागला. असाच काहीसा प्रकार दोन महिन्यांपूर्वी मुलुंड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला होता, वाहतूक पोलिसांना धमकी देणाऱ्या  व्यापाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारताच त्याने देखील या प्रकारे माफी मागितली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here