कर्ज फेडण्यासाठी त्याने केला चोरीचा प्लॅन, पण घडले भलतेच!

अनिल दुबे याला श्रीमंतीच्या थाटात राहण्याची सवय होती, त्याला झटपट गाडी, बंगल्याप्रमाणे घर हवे होते, त्याने कर्ज काढून त्याची ही स्वप्न देखील पूर्ण केली.

कर्जात बुडाल्यामुळे त्याने पूर्वी काम करीत असलेल्या बँकेत चोरीचा बेत आखला होता, चोरी करण्यासाठी बँकेत आल्यानंतर बँकेत हजर असलेल्या व्यवस्थापक योगिता चौधरी आणि रोखपाल श्वेता देवरुखकर यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याने दोघींवर चाकूने हल्ला करून बँकेतील ३ कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पळून जात असताना पकडला गेला. हल्ल्यात जखमी झालेल्या बँक व्यवस्थापक योगिता चौधरी हीचा मृत्यू झाला असून श्वेता देवरुखकर ही जखमी झाली.

कर्जाचा डोंगर पाहून कंटाळलेला 

अनिल दुबे (३८) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. नालासोपारा येथे राहण्यास असलेल्या अनिल दुबे हा ज्या बँकेत घटना घडली त्या आयसीआयसीआय बँकेच्या विरार शाखेत व्यवस्थापक म्हणून वर्षभरापूर्वी कामाला होता. दुसऱ्या एका राष्ट्रीयकृत बँकेने त्याला पगार आणि पद वाढवून दिल्यामुळे तो वर्षभरापासून भाईंदर येथे दुसऱ्या बँकेत कामाला लागला होता. अनिल दुबे याला श्रीमंतीच्या थाटात राहण्याची सवय होती, त्याला झटपट गाडी, बंगल्याप्रमाणे घर हवे होते, त्याने कर्ज काढून त्याची ही स्वप्न देखील पूर्ण केली. परंतु कर्जाचा डोंगर कोटीच्या वर जाताच त्याचा जवळजवळ सर्व पगार कर्जाचे हप्ते फेडण्यात जाऊ लागला होता. या कर्जातून बाहेर पाडण्यासाठी अनिल दुबेने बँकेत चोरी करण्याचा बेत आखला होता. त्यासाठी त्याने तो पूर्वी काम करीत होता तीच बँक निवडली. गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बँकेच्या सुरक्षा रक्षकाची ड्युटी संपली होती व दुसरा सुरक्षारक्षक आलेला नसल्यामुळे बँकेच्या बाहेर कोणीच नव्हते. त्याचा फायदा घेऊन अनिल दुबे हा बँकेत शिरला. बँकेत व्यवस्थापक योगिता चौधरी आणि रोखपाल श्वेता देवरुखकर या दोघीच होत्या, इतर कर्मचारी ६ वाजताच निघून गेले होते.

(हेही वाचा : अनिल देशमुखांच्या वाढल्या अडचणी! अटकेपासून संरक्षण देण्यास न्यायालयाचा नकार)

जखमी अवस्थेत तिने केली यशस्वी धडपड

बँकेचा दररोजचा हिशोब बघून त्या दोघी सुद्धा निघण्याच्या तयारीतच होत्या आणि दुबेला बघून ‘आप यहा क्या कर रहे हो?’, असा प्रश्न योगिता यांनी विचारला. त्यावेळी अनिल दुबेने ‘मॅडम, मेरे बीच मे मत आना, मै जो करने आया हू वो मुझे करने दो|”, असे बोलून तिजोरीकडे जात असताना योगिता आणि श्वेता या दोघींनी त्याला कडाडून विरोध केला असता अनिल दुबेने कमरेला खोसलेल्या चाकूने दोघींवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. दोघी रक्ताच्या थारोळ्यात पडताच अनिल दुबे हा तिजोरीकडे गेला आणि त्यातील दागिने बॅगेत भरू लागला. बँक व्यवस्थापक योगिता जखमी अवस्थेत बँकेच्या अर्धवट उघड्या असलेल्या शटरजवळ आल्या आणि त्यांनी शटरवर जोर जोरात मारण्यास सुरुवात केली. त्याच वेळी बाहेर एक तरुणी आणि काही तरुण जात असताना त्यांना बँकेचा शटर ठोकण्याचा आवाज आला व त्यांनी ताबडतोब जाऊन शटर उघडताच व्यवस्थापक योगिता उभी राहून बँकेच्या आत ‘तो’ आहे, असे हाताने इशारा करू लागली. आतमध्ये कॊणीतरी आहे, म्हणून या तरुणाने सावधगिरी बाळगून बाहेर आरडाओरड करताच अनिल दुबे हा एका हातात बॅग आणि दुसऱ्या हातात दागिण्याच्या पेट्या घेऊन बाहेर पळून जात असताना जमलेल्या गर्दीतील नागरिकांनी त्याला पकडले.

…आणि तिचे प्राण गेले!

विरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अनिल दुबे याला मालमत्तेसह अटक करून जखमींना ताबडतोब उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी योगिता चौधरीला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी हत्या, दरोडयांचा गुन्हा दाखल करून त्याच्याजवळून ताब्यात घेतलेल्या बॅगेतून ३ कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. त्याला ३० जुलै रोजी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला या ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here