प्रभू श्रीरामाची भव्य प्रतिमा असलेल्या रथ… ढोल ताशांचा गजर… शंखाचे वादन…’जय श्रीराम’चा जयघोष अशा आनंद आणि उत्साहपूर्ण राममय वातावरणात अयोध्येतील रामलल्लांची मूर्ती असलेल्या मंदिराच्या (Shri Ram Mandir) गर्भगृहात पूजन करून आलेल्या अक्षतांचे पूजन करत ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरातपासून भव्य मंगल कलश यात्रा काढण्यात आली. यावेळी महिला डोक्यावर अक्षता कलश घेऊन यात्रेत सहभागी झाल्या होत्या. यात्रेचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले.
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने या २४ कलशातील अक्षता पश्चिम महाराष्ट्रातील सर्व गावातील प्रत्येक घरात देण्यापूर्वी पुण्यात कलश यात्रा काढण्यात आली. त्यानंतर स्वारगेट जवळील दादावाडी जैन मंदिरामध्ये या अक्षतांचे कलश ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. यशोधन साखरे यांच्या हस्ते पश्चिम महाराष्ट्रातील २४ भागांतील विश्व हिंदू परिषदेच्या प्रतिनिधींकडे कलश सोपविण्यात आले.
(हेही वाचा 26/11 Do not forget Do not forgive कार्यक्रमातून वाहण्यात आली मुंबई हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली)
कसबा गणपती मंदिरात या सर्व कलशांचे विविध जाती व संप्रदायांमधील २४ दांपत्यांच्या हस्ते विधिवत मंत्रोच्चाराने पूजन करण्यात आले. कसबा देवस्थानचे प्रमुख ठकार यांनी पूजेला बसलेल्या सर्वांना संकल्प दिला. सज्जनगडावरील समर्थ सेवा केंद्राचे कार्यवाह योगेश बुवा रामदासी, रा. स्व. संघ प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, प्रांत संघचालक नाना जाधव, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री संजय मुद्राळे, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष पांडुरंग राऊत, संघटन मंत्री अनिरुद्ध पंडित यावेळी उपस्थित होते. संपूर्ण यात्रेचे नियोजन विश्व हिंदू परिषदेचे प्रांताचे विशेष संपर्कप्रमुख किशोर चव्हाण यांनी केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर व कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर येथे कलशांचे पूजन व यात्रेचे स्वागत करण्यात आले.
Join Our WhatsApp Community