अंधेरी, पार्ल्यात चोरांचा महापालिकेला हिसका: रस्त्यावरील ‘या’ वस्तूंची होते चोरी

99

दादर शिवाजी पार्क येथील नव्याने बनवलेल्या रस्त्यांच्या पर्जन्य जलवाहिन्यांवरील झाकणे चोरीला जाण्याचे प्रकरण ताजे असताना, आता अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी या परिसरातील मलनिस्सारण वाहिन्यांवरील मॅनहोलची झाकणे चोरीला जाण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिकेला आता या झाकण चोरांविरोधात पोलिस ठाण्यात धाव घ्यावी लागली आहे.

बारा हजारांचे एक झाकण

मलनिस्सारण वाहिनी स्वच्छ करण्‍यासाठी व नियमित तपासणी करण्यासाठी वाहिनीला ठराविक अंतरावर मॅनहोल आणि त्यावर झाकण दिलेले असते. सदर वाहिनी ही १५ ते २५ फूट खोल असल्‍यामुळे चांगली सुरक्षितता असावी म्हणून मॅनहोलची झाकणे ही लोखंडी आणि मजबूत असतात. त्यामुळे या एका झाकणाची किंमत अंदाजे बारा हजार रुपये इतकी असते.

(हेही वाचाः महापालिकेच्या बैठका आता प्रत्यक्ष उपस्थितीतच: शासनाचा निर्णय)

पहाटेच्या सुमारास होते चोरी

के/पूर्व विभागात वेगवेगळ्या परिसरात असलेल्या मलनिस्सारण वाहिन्यांवरील लोखंडी झाकणाला चोरट्यांनी लक्ष्‍य बनवले आहे. मागील काही दिवसांपासून के/पूर्व विभागात अंधेरी, विलेपार्ले, जोगेश्वरी परिसरात मिळून सुमारे २० ते २५ झाकणे चोरीला गेली आहेत. विशेषतः अंधेरी एमआयडीसी परिसरात अधिक संख्येने झाकणे चोरीला गेली आहेत. या झाकणांची चोरी पहाटेच्या सुमारास करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

Manhole 1

…तर होऊ शकतो अपघात

मॅनहोल उघडे राहिल्‍यामुळे त्‍या मॅनहोलमध्‍ये एखादी व्यक्ती पडून अथवा धावत्या वाहनांचे चाक अडकून अपघात होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. मॅनहोल्सचे झाकण नसल्याने साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने एलफिन्सटन येथे डॉ. दिपक अमरापूरकर यांचा या मॅनहोल्समध्ये पडून अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर मुंबईतील मॅनहोल्सच्या जाळ्यांची तसेच त्यावरील झाकणांची विशेष काळजी घेत ते बसवण्याची कार्यवाही महापालिकेच्या विभाग कार्यालयाच्यावतीने करण्याचे निर्देश वारंवार महापालिका आयुक्तांकडून दिले जातात.

(हेही वाचाः अनधिकृत बांधकामांबाबत तत्कालीन आयुक्तांच्या ‘त्या’ निर्देशाकडे महापालिका अधिकारी, पोलिसांचे दुर्लक्ष)

वारंवारच होत आहेत झाकणे गायब

महापालिकेचे सहायक आयुक्त हे मॅनहोलवर झाकण नसल्याचे आढळताच, नवीन झाकण लावण्याची कार्यवाही प्रशासनाकडून त्वरित करत असतात. मात्र, महापालिकेच्‍या के/पूर्व विभाग अंतर्गत अंधेरी(पूर्व), विलेपार्ले(पूर्व) व जोगेश्‍वरी(पूर्व) या पश्चिम उपनगरांमध्‍ये मलनिस्सारण वाहिनीचे जाळे महापालिकेतर्फे उभारण्‍यात आलेले आहे. त्यावरील झाकणे वारंवार गायब होत असल्याने हा चोरीचा प्रकार असल्याचे लक्षात आले.

सी.सी.टिव्ही फुटेजमध्ये चोरी उघड

मॅनहोल झाकण चोरीला जाण्याचे प्रकार सतत वाढत असल्याने अखेरीस, संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन त्या आधारे, के/पूर्व विभागातील महापालिका अधिकाऱ्यांमार्फत एम.आय.डी.सी. पोलिस ठाणे व सहार पोलिस ठाणे येथे अज्ञातांविरोधात चोरीचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

(हेही वाचाः मुख्यमंत्र्यांना हवी फक्त ५५ टक्के अनधिकृत बांधकामांवर कारवाई?)

शिवाजीपार्कमध्येही झाली होती चोरी

एका महिन्यापूर्वी दादर शिवाजी महाराज पार्क परिसरातील नव्याने बनवलेल्या रस्त्यांवरील पर्जन्य जलवाहिनींच्या मॅनहोल्सवरील पाच ते सहा झाकणे अशाचप्रकारे चोरीला गेली होती. परंतु जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी संबंधित कंत्राटदाराला विनंती करुन, पुन्हा त्यांच्याकडून ही झाकणे लाऊन घेण्याचा प्रयत्न केला.

म्हणून पुन्हा बसवली लोखंडी झाकणे

यापूर्वी अशाचप्रकारे गटारांची झाकणे चोरीला जात असल्याने महापालिकेने फायबरची झाकणे बनवून घेतली होती. परंतु फायबरची झाकणे ही पाण्याच्या दाबाबरोबरच वर उचलली जात असल्याने याऐवजी पुन्हा एकदा लोखंडी जस्तांची झाकणे बनवून घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

(हेही वाचाः गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचा अडथळा दूर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.