दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या शेजारील रस्त्यांच्या कामाला एक वर्ष होत नाही, तोच या रस्त्यावरील पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या गटारांची झाकणेच आता चोरीला जाऊ लागली आहेत. मागील पाच दिवसांमध्ये पार्क परिसरातील केळुस्कर मार्गावरील भूमिगत गटारांच्या मॅनहोल्सवरील पाच लोखंडी झाकणे चोरीला गेली आहेत. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून चोरीला गेलेल्या झाकणांच्या मॅनहोल्सवर सध्या सिमेंटची झाकणे तात्पुरत्या स्वरुपात ठेवण्यात आली असली, तरी या वाढत्या चोरीच्या प्रकरणांमुळे याठिकाणी उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
पाच झाकणे गेली चोरीला
छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या उत्तर दिशेला असलेल्या केळुस्कर मार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण मागील वर्षात पूर्ण करण्यात आले. या रस्त्यांचे काँक्रीटीकरण वर्षभरापूर्वी झालेले असताना, आता या रस्त्यांवरील पर्जन्य जलवाहिनीवर असलेल्या मॅनहोल्सची लोखंडी झाकणे चोरीला गेल्याची प्रकरणे समोर आली आहेत. या मार्गावरील पार्काच्या कठड्याला जोडून असलेल्या बाजूची चार आणि केळुस्कर मार्ग आणि ले.दिलीप गुप्ते मार्ग जंक्शनवर याच रस्त्याच्या बाजूला असलेल्या मॅनहोल्सचेही एक झाकण चोरीला गेले आहे. मागील आठ दिवसांपासून हे चोरीचे प्रकार वाढलेले असून, तब्बल पाच मॅनहोल्सची झाकणे चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे.
(हेही वाचाः शिवसेना राणेंच्या विरोधात रस्त्यावर, भाजपने उरकले गिरगाव चौपाटीवरील प्रसाधनगृहाचे लोकार्पण)
लवकरच झाकणे लावली जाणार
या रस्त्यावर पदपथाच्या बाजूला वाहने उभी केली जात असली तरी सकाळच्या वेळेला फिरायला येणारे नागरिक हे पदपथासह रस्त्यावरुनही फिरत असतात. त्यामुळे चोरीला गेलेल्या झाकणांमुळे दुघर्टना तथा अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भात जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मागील आठ दिवसांपूर्वी ही झाकणे गायब झाली आहेत, ती चोरीला गेल्याचा संशय आहे.
परंतु मॅनहोल्सची झाकणे गायब झाल्याने त्याठिकाणी तातडीने सिमेंटची झाकणे ठेवण्यात आली आहेत. तर काही ठिकाणी बांबू लाऊन तेथील परिसर बंदिस्त करण्यात आला आहे. यासंदर्भात लोखंडी झाकणे बसवण्याची कार्यवाही सुरू आहे. संबंधित कंत्राटदाराने या रस्त्याचा हमी कालावधी असल्याने लोखंडी झाकणे लाऊन देण्याची तयारी दर्शवली आहे, त्यानुसार झाकणे लवकरच लावली जातील.
(हेही वाचाः मुंबईतील आश्रम शाळेत शिरला कोरोना… 22 मुलांना झाली लागण)
Join Our WhatsApp Community