अविनाश पाठक
ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे गेल्या आठवड्यात दुःखद निधन झाले. माजी पंतप्रधान असल्यामुळे संपूर्ण शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे अंत्यसंस्कार दिल्लीतील निगमबोध स्मशानभूमीत करण्यात आले. यावरून आता राजकीय वाद सुरू झाले असून ते अजून तरी थांबण्याचे नाव घेत नाहीत. (Manmohan Singh Death)
सर्वसाधारणपणे पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा माजी पंतप्रधान, माजी राष्ट्रपती यांचे निधन झाले तर दिल्लीत यमुना नदीच्या काठी राजघाट परिसरात अंत्यसंस्कार करण्याची प्रथा आहे. १९४८ साली स्वातंत्र्यानंतर सर्वप्रथम या परिसरात महात्मा गांधींच्या पार्थिवावर तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर १९६४ मध्ये पंडिंत नेहरूंच्या तर १९६६ मध्ये लालबहादूर शास्त्रींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. आतापर्यंत इथे ज्या ज्या मान्यवरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यांच्या समाधी तेथेच बांधण्यात आलेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत त्या परिसरात १८ मान्यवरांच्या समाधी आहेत. त्यात काही पंतप्रधान राष्ट्रपती यांच्या जशा समाधी आहेत, तशाचच कोणत्याही घटनात्मक पदावर कधीही नसलेल्या स्वर्गीय संजय गांधी यांचीही समाधी आहे. परिणामी बरीचशी सरकारी जमीन या समाधीस्थळामुळे व्यापली गेलेली आहे.
(हेही वाचा – Cyber Crime : App च्या मदतीने व्यावसायिकाची ३ कोटींची फसणूक)
डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले आणि थोड्याच वेळात लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारने डॉ. मनमोहन सिंग यांचा अपमान केल्याचा आरोप केला. त्यांच्या मतानुसार माजी पंतप्रधान असल्यामुळे डॉ. मनमोहन सिंहांच्या पार्थिवावर राजघाट येथेच अंत्यसंस्कार करणे गरजेचे होते. राहुल गांधींनी पाठोपाठ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनाही कंठ फुटला. त्यांनीही मोदींनी अपमान केल्याचा राग आळवला. मग सर्वच काँग्रेस नेत्यांना अपमान झाल्याचा भास होऊ लागला. त्यांनी मोदींचा निषेध करण्यास सुरूवात केली. त्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे देखील आघाडीवर होते.
या संदर्भात सध्या केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने खुलासाही केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या संदर्भात काँग्रेस पक्षाने सरकारकडे तसे पत्र देऊन मागणी करणे गरजेचे होते. ते पत्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी फार उशिरा दिले. त्यामुळे त्यावर निर्णय घेता आला नाही असे सत्ताधारी पक्षाचे म्हणणे आहे.
डॉ. मनमोहनसिंग हे फक्त देशाचे पंतप्रधान होते, इतकेच कारण नाही, तर त्यांनी या देशात आर्थिक सुधारणांचा पाया रचला असाही दावा काँग्रेस पक्ष करत आहे. ते तब्बल दहा वर्ष देशाचे पंतप्रधान होते आणि त्यांच्या काळात अनेक क्रांतिकारी निर्णय झाले, याकडेही काँग्रेसचे नेते लक्ष वेधत आहेत. त्यामुळे तरी त्यांना राजघाटावर अंत्यसंस्कारासाठी जागा द्यायला हवी होती असे काँग्रेस पक्षाचे म्हणणे असल्याचे दिसून येत आहे.
इथे प्रश्न असा येतो की, काँग्रेस (Congress) पक्षाला अशी टीका करण्याचा नैतिक अधिकार आहे का? असे म्हणण्याचे कारण असे की, याच काँग्रेस पक्षाने अनेकदा सत्तेचा दुरुपयोग करून काही वेळा काही व्यक्तींना अशी व्यवस्था नाकारली आहे, तर काही वेळा संधीचा गैरफायदा ही घेतला आहे. इथे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांचे उदाहरण देता येईल. नरसिंहराव हे काँग्रेस पक्षाचे लालबहादूर शास्त्रींनंतर गांधी नेहरू घराण्याव्यतिरिक्त पहिलेच कॉग्रेसी पंतप्रधान होते. त्यांनी पाच वर्षाची कारकीर्द देखील पूर्ण केली होती. त्या वेळी राजीव गांधींचे निधन झाले होते. गांधी घराण्यात नंतर सोनिया गांधींचा नंबर होता. कारण राहुल आणि प्रियंका खूप लहान होते, आणि त्या परिस्थितीत सोनिया गांधींनी राजकारणात येण्यास नकार दिला होता. त्यामुळे काँग्रेस पक्षाचाच कोणीतरी व्यक्ती पंतप्रधान होणार हे निश्चित होते. नरसिंहराव आणि शरद पवार हे दोघे दंड थोपटून मैदानात होते. त्यात काँग्रेसजनांनी नरसिंहरावना कौल दिला आणि ते पंतप्रधान झाले. नरसिंहरावांनी पूर्ण पाच वर्षे आपली कारकीर्द यशस्वी केली. त्यांच्या काळात अनेक चांगले निर्णय झाले. विशेष म्हणजे ज्या वेळी ते पंतप्रधान झाले त्या वेळी देश आर्थिक संकटात होता. तिजोरीत खडखडाट होता परिणामी देशातील सोने जागतिक बँकेकडे गहाण ठेवावे लागले होते. ज्या मनमोहनसिंग यांचा आज काँग्रेसजन उदो उदो करत आहेत, त्या मनमोहन सिंगांना राजकारणात सक्रिय करणारे नरसिंहरावच होते. सध्याच्या बिघडलेल्या आर्थिक स्थितीत राजकारणी नव्हे तर अर्थतज्ञ हाच अर्थमंत्री हवा असा निर्णय घेऊन नरसिंहराव यांनी डॉ. मनमोहनसिंग यांना अर्थमंत्री केले. मनमोहन सिंग हे आधी रिझर्व बँकेचे गव्हर्नर, नियोजन आयोगाचे सदस्य, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार अशा पदांवर कार्यरत राहिलेले होते. त्यामुळे देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढून आर्थिक शिस्त लावण्याची क्षमता या अर्थतज्ञ व्यक्तीकडेच आहे, हे ओळखून नरसिंहराव यांनी या गैरराजकीय अर्थतज्ञ व्यक्तीला अर्थमंत्री केले होते. त्यांना पूर्णतः मोकळा हात देऊन नरसिंहरावांनी अल्पावधीत देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढले होते. त्याचवेळी आपले अल्पमतातील सरकारही त्यांनी व्यवस्थित सांभाळले होते आणि पाच वर्षाची कारकीर्द त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली.
या काळात सोनिया गांधी जरी राजकारणात येऊ इच्छित नव्हत्या, तरी सरकारवर त्यांना आपला वचक ठेवायचा होता. आणि तिथेच त्यांचे आणि नरसिंहरावांचे पटले नाही. त्यामुळे नरसिंहराव हे सोनिया गांधींचे दुश्मन बनू लागले. १९९६ मध्ये काँग्रेसची केंद्रातील सत्ता गेली, तसे नरसिंहराव यांचे महत्त्व पद्धतशीरपणे कमी केले गेले. शरद पवारांना विरोधी पक्षनेता केले आणि नरसिंहरावांना अडगळीत टाकले. नंतर १९९८ मध्ये सोनिया गांधीच राजकारणात सक्रिय झाल्या. काँग्रेस पक्षाचे सर्व नेतृत्व त्यांच्याच हातात गेले आणि नरसिंहराव राजकारणातून निष्क्रिय झाले. ते दिल्लीत त्यांना मिळालेल्या सरकारी बंगल्यात एकाकी जीवन जगत होते. नरसिंहरावंचे २००५ मध्ये दिल्लीत निधन झाले. ते देखील माजी पंतप्रधान होते आज काँग्रेस जो प्रोटोकॉल मनमोहन सिंग यांच्याबाबत पाळला जावा म्हणून आग्रह धरते, तोच प्रोटोकॉल नरसिंहराव यांनाही द्यायला हवा होता. मात्र त्यांना अंत्यसंस्कारासाठी राजघाटावर जागा मिळणे तर दूरच राहिले, पण तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने त्यांचा अंत्यसंस्कार दिल्लीतही होऊ दिला नाही. साधारणपणे काँग्रेस पक्षातील कोणत्याही ज्येष्ठ नेत्याचे निधन दिल्लीत झाले, तर त्याचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात ठेवले जाते. नरसिंहराव हे जसे पंतप्रधान होते तसेच काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील राहिले होते. मात्र त्यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालयात देखील ठेवले गेले नाही. त्यांच्या नातेवाईकांना त्यांचे पार्थिव दिल्लीतून आंध्रातील त्यांच्या गावी न्यावे लागले, आणि तिथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे दिल्लीत कुठेही स्मारक उभारले नव्हते.
राजघाटावर पंतप्रधान राष्ट्रपती किंवा मग थोर राष्ट्रीय नेते अशांचेच अंत्यसंस्कार केले जातात आणि तिथेच त्यांचे समाधी स्थळ विकसित केले जाते. मात्र २३ जून १९८० रोजी निधन झालेले संजय गांधी यांच्या पार्थिवावरही अंत्यसंस्कार राजघाटावरच करण्यात आले. राजीव गांधी हे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुपुत्र होते, इतकेच एक कारण म्हणून त्यांना राजाघाटावर जागा देण्यात आली. त्यावेळी लोकदल या पक्षाचे नेते चौधरी चरणसिंह यांनी यासंदर्भात आक्षेप घेतला होता. त्यांनी लोकसभेत देखील हा मुद्दा उठवला होता. मात्र तत्कालीन काँग्रेस सदस्यांनी त्यांना विरोध केला होता. हे बघता जी व्यक्ती राष्ट्रीय स्तरावर चा नेता नाही, किंवा पंतप्रधान, राष्ट्रपती अशापैकी कोणत्याही पदावर नाही, अशा व्यक्तीलाही केवळ पंतप्रधानांचा मुलगा म्हणून प्रथा परंपरा आणि नियम बाजूला सारत राजघाटावर जागा दिली गेली होती. हे सर्व काँग्रेसजनांनीच घडवून आणले होते.
आज काँग्रेसजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली घटना भारतीय जनता पक्ष मोडीत काढायला निघाला आहे असा आरोप करीत आहेत. मात्र याच बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसजनांनी यापूर्वी कधी कधी केव्हा केव्हा आणि कसा कसा अपमान केला याची साद्यंत माहिती देखील सध्या सर्वत्र प्रसारित केली जात आहे. बाबासाहेबांचे निधन १९५६ मध्ये झाले. त्यानंतर २०१४ पर्यंत या देशात काँग्रेसची सत्ता होती. मात्र देशाला घटना देणाऱ्या आणि देशातील पददलितांना मुख्य प्रवाहात आणणाऱ्या या महामानवाला काँग्रेसने कधीही भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले नाही. त्यांचे मुंबईत जिथे अंत्यसंस्कार झाले, तिथे स्मारकही उभारण्याची तसदी घेतली नाही. हे काम शेवटी भारतीय जनता पक्षाच्या कारकिर्दीत झाले आहे. त्यांना भारतरत्न सन्मान भाजपाच्याच काळात दिला गेला आणि त्यांच्या स्मारकाचे काम देखील सुरू झाले आहे.
काँग्रेसने आरडाओरड सुरू करताच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी या देखील मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी आरोप केला आहे की वर्षानुवर्ष आपले वडील प्रणव मुखर्जी यांनी काँग्रेसचीच सेवा केली आणि विविध सन्माननीय पदावर ते कार्यरत राहिले. राष्ट्रपती सारखे सर्वोच्च पद देखील त्यांनी भूषविले. काँग्रेसतर्फेच ते राष्ट्रपती बनले होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर काँग्रेस कार्यकारिणीने शोक प्रस्ताव संमत करणे आवश्यक होते. मात्र प्रणव मुखर्जी यांचे सोनिया गांधी यांच्याशी पटत नसल्यामुळे त्यांनी शोक प्रस्ताव पारित होऊ दिला नाही, असा आरोप शर्मिष्ठा मुखर्जी यांनी केला आहे.
हे सर्व मुद्दे लक्षात घेता काँग्रेसला पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी राजाघाटावर जागा दिली नाही, यासंदर्भात टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही हे सिद्ध होते. त्यांनी फक्त या प्रसंगावरून राजकारण करण्यासाठी हा मुद्दा उचलला आहे हे स्पष्ट दिसते आहे. त्यांच्या या राजकारणाला जनता ओळखून आहे हे नक्की. काँग्रेसजनांचे नेहरू गांधी परिवाराशी सख्य नव्हते किंवा ज्या व्यक्ती नेहरू गांधी परिवारांकडेच सत्ता राखण्याच्या प्रयत्नात आडव्या येत होत्या, अशा व्यक्तींचा या परिवाराने आणि काँग्रेस पक्षाने कायम दुस्वास केला हाच निष्कर्ष या सर्व प्रकारातून निघतो. या परिवाराचे महत्त्व कायम रहावे यासाठी हाती सत्ता आल्यावर या परिवारातील प्रत्येक व्यक्तीने असा सत्ता सोपान चढताना अडचणीच्या ठरणाऱ्या व्यक्तींबाबत चुकीचा इतिहास देखील लिहवून घेतला आणि तोच प्रचलित केला असाही आरोप केला जातो. त्यातही तथ्य असलेच पाहिजे. म्हणून तर १९४७ मध्ये पंतप्रधान पदाचे खरे दावेदार असणारे सरदार वल्लभभाई पटेल यांचे उचित स्मारक होण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे लागले, हे वास्तव नाकारता येत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचाही चुकीचा इतिहास लिहिला गेला. त्यांची आजही बदनामी केली जाते आहे. असाच चुकीचा इतिहास अनेक व्यक्ती, जाती आणि समाजांबद्दल लिहिला गेला आहे. एकूणच काँग्रेस पक्ष ही आपली खाजगी मालमत्ता आहे अशाच अविर्भावात नेहरू गांधी परिवाराने पक्ष आणि सत्ता यांचा वापर केला आहे, आणि त्यांचे चेलेचपाटे देखील त्याला आजवर पाठिंबा देत आले आहेत हे स्पष्ट दिसते. डॉ. मनमोहनसिंग हे या परिवाराशी अखेरपर्यंत एकनिष्ठ होते, म्हणून आज त्यांचा मुद्दा पुढे करून राजकारण केले जाते आहे.
अर्थात आज जनता शहाणी झालेली आहे. काँग्रेसची सत्तालालसा जनतेच्या लक्षात आलेली आहे. त्यामुळेच जनता काँग्रेस पक्षाला निवडणुकीच्या रिंगणात त्यांची जागा दाखवते आहे. एका काळी या देशात काँग्रेसला पर्याय नव्हता. मात्र आज हळूहळू देशातले काँग्रेसचे अस्तित्व संपत चाललेले आहे. कारण जनतेने आता वास्तव काय ते ओळखलेले आहे. म्हणूनच आता जनता काँग्रेसच्या या कोल्हेकुईला कधीच दाद देणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
वाचकहो पटतेय का तुम्हाला हे…….?
त्यासाठी आधी समजून तर घ्या राजेहो…..! (Manmohan Singh Death)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community