सध्या मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे मागील ८ दिवसांपासून उपोषण सुरूच आहे. शनिवारी त्यांची प्रकृती खालावली होती, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. आता पाटील यांनी सरकारला २० फेब्रुवारीपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. सरकारने कुणबी जातप्रमाणपत्रे नोंदी सापडणाऱ्या मराठ्यांच्या सगेसोयऱ्यांनाही आरक्षण देण्यात यावे, यावर निर्णय घ्यावा अन्यथा सरकारला मराठ्यांचा रोष परवडणारा नाही, असा इशारा पाटील यांनी रविवारी, १७ फेब्रुवारी रोजी माध्यमांशी बोलताना दिला.
सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्यात यावे
राज्य सरकारच्या मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सरकारकडे सुपूर्द करण्यात आला आहे. त्यामध्ये मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यावर विशेष अधिवेशनात चर्चा होऊन निर्णय होणार आहे. यावर मात्र मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आम्हाला मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार आरक्षण मिळाले तरी चांगले आहे, मात्र त्यासोबत कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे मिळणारे आरक्षणही देण्यात यावे, मुख्यमंत्री शिंदे यांनी तसे आश्वासन दिले असून त्यानुसार नोंदी शोधण्यास सुरुवात झाली आहे, ५४ लाख मराठा समाजाला आणि त्यांच्या सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्यात यावे, दोन्ही आरक्षण मिळाले तर मराठा समाजाचे हित होणार आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.
विशेष अधिवेशनाच्या आधी कुणबी जात प्रमाणपत्रावर निर्णय घ्या
दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जरांगे पाटील यांना मराठा समाजाचे नेते आम्ही मानत नाही, असे वक्तव्य केले. त्यावर बोलताना पाटील (Manoj Jarange Patil) यांनी, आम्हाला यावर काही बोलायचे नाही, हा लढा मराठा समाजाचा आहे, यात कुणी नेता नाही, असे म्हटले. दरम्यान सरकारने विशेष अधिवेशनाच्या आधी कुणबी जात प्रमाणपत्राच्या आधारे देण्यात येणाऱ्या आरक्षणावर निर्णय घेण्यात यावा, या भूमिकेवर पाटील ठाम आहेत.
Join Our WhatsApp Community