राज्याच्या कानाकोपऱ्यांतून प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मोठ्या आशेने लोक मंत्रालयात (Mantralaya) येत असतात. परंतु नवीन नियमांमुळे मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी जनतेला एकच प्रवेशद्वार असल्याने प्रवेश मिळवण्यासाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. ही रांग आता गार्डन गेट पासून सुरू होऊन फिरून जवळजवळ मंत्री बंगल्यांच्या समोरून जनता जनार्दन गेट पर्यंत पोहचली आहे.
“आमचे सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार असून मंत्रालय (Mantralaya) हे लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठीच असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार राज्यातील जनतेला देत असतात. तरी त्यांच्याच प्रशासनातील सरकारी फतव्यामुळे मंत्रालयात प्रवेशासाठी सामान्य जनतेला तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. मंत्रालयातील गर्दीचे नियोजन करण्याच्या उद्देशाने नवीन नियमावली करण्यात आली आणि या नियमावलीप्रमाणे जनता जनार्दन गेट हे फक्त आणि फक्त मंत्र्यांसाठीच वापरात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी फक्त आणि फक्त गार्डन गेट जवळ मंत्रालय प्रवेश पास काढण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पास काढण्यासाठी जवळपास अर्धा ते पाऊण तास रांग लावावी लागते आणि पुढे प्रवेश मिळवण्यासाठी अर्धा किलोमीटर पेक्षा अधिकच्या रांगेत वाट पाहत प्रवेश मिळवावा लागतो. तोपर्यंत संबंधित विभागाचे मंत्री जागेवर राहतील याचा देखील काही नेम नाही.
(हेही वाचा – Maratha Reservation: संदीप शिंदे समितीचा प्रथम अहवाल स्वीकारला, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय)
आज मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक असल्याने सुरेश सावंत आपले काम घेऊन मंत्रालयात (Mantralaya) प्रवेश मिळवण्यासाठी आले होते. त्यावेळी हिंदुस्थान पोस्टशी बोलतांना त्यांनी सांगितले की, “आम्ही तासंतास रांगेत उभे असतो. मात्र लोकप्रतिनिधी, त्यांचे कार्यकर्ते, विकासक अशा मोठय़ा लोकांना अने्क वेळा प्राधान्याने प्रवेश देताना आम्हाला थांबविले जाते. दुपारी दोन वाजता येऊनही पाचच्या सुमारास मंत्र्यालयात प्रवेश मिळतो. मग आम्ही मंत्री, अधिकाऱ्यांना केव्हा भेटायचे आणि कामे कशी करून घ्यायची,” असा सवाल त्यांनी उभा केला.
मराठा आरक्षणामुळे मंत्रालय सुरक्षेत वाढ…
मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय सुरक्षा मोठ्याप्रमाणात वाढवण्यात आली आहे. मंत्रालयात (Mantralaya) प्रवेश करण्यासाठी असलेल्या तिन्ही परवेशद्वारावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे मंत्रालयात प्रवेश मिळवण्यासाठी सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करून मंत्रालयात प्रवेश मिळवावा लागत आहे. (Mantralaya)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community