सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून, 24 मे रोजी मराठा आंदोलकानी मुंबईत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलनाच्या पवित्र्यात असणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान काही आंदोलक हे मंत्रालयाच्या गेट बाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न करणार होते. त्यांना गेटवर काळे झेंडे बांधण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. दरम्यान हे आंदोलक औरंगाबाद परिसरातील असल्याची माहिती समोर येत असून, माता रमाबाई पोलिस ठाण्यात या आंदोलकांना नेण्यात आले आहे.
मेंटेचाही आंदोलनाचा इशारा
दरम्यान शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी 5 जूनला आंदोलनाचा इशारा दिला असून, ऐन कोरोना संकटात मराठा समाज रस्त्यावर उतरणार आहे. शिवसंग्रामचे विनायक मेटे सारथीच्या व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मदत करण्याची मागणी विनायक मेटे यांनी केली आहे.
मराठा आरक्षणासाठी अपयशी ठरल्याप्रकरणी औरंगाबादेतील मराठा आंदोलकांची मुंबईत धडक! मंत्रालयात जाण्याआधी आंदोलकांना मनीष मार्केट परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बाधकांम मंत्री अशोक चव्हाण यांच्या विरोधात घोषणाबाजी! #MarathaReservation #Mumbai pic.twitter.com/PvwuiO0tR8
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) May 24, 2021
भाजपचेही कार्यकर्ते उतरणार रस्त्यावर
मराठा आरक्षणासाठीच्या कायदेशीर लढाईत महाविकास आघाडी सरकारने कच खाल्ली असल्याने आता आरक्षण मिळविण्यासाठी समाजाकडून जी आंदोलनात्मक पावले टाकली जातील, त्यामध्ये भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ओळख बाजूला ठेवून मराठा आंदोलकांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी होईल, असे भाजपकडून सांगण्यात आले होते. आरक्षण हा राज्यातील मराठा समाजाच्या विकासाचा व समाजातील तरुणांच्या भवितव्याचा मुद्दा असतानाही महाविकास आघाडी सरकारने कायदेशीर लढाईत कुचराई केल्याचा आरोप माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केला होता.
(हेही वाचा : परमबीर सिंग यांना ९ जूननंतर होणार अटक? )
मराठा आरक्षण निकालाचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन
मराठा आरक्षणा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश व मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली होती. या समितीमध्ये ज्येष्ठ विधीज्ञ रफिक दादा, राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विधीज्ञ दरायस खंबाटा, सेवानिवृत्त सनदी अधिकारी सुधीर ठाकरे, वरिष्ठ विधी सल्लागार व सचिव संजय देशमुख, विधी व न्याय विभागाचे सचिव (विधी विधान) भूपेंद्र गुरव, ॲड. आशिष राजे गायकवाड यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. विधी व न्याय विभागाच्या सहसचिव बी.झेड. सय्यद या समितीच्या सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
Join Our WhatsApp Community