मराठा पेटणार, खासदार-आमदारांचे पुतळे जाळणार

100

एक मराठा लाख मराठा म्हणत मराठा समाजाने भाजपा शिवसेना सरकारच्या काळात मोठे मोर्चे काढले. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा मराठ्यांचा एल्गार पहायला मिळणार असून, मराठा समन्वय समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ४८ खासदार आणि मराठा समाजातील १८१ आमदारांचे प्रतिकात्मक पुतळे दहन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तर कोल्हापूरमध्ये येत्या २३ सप्टेंबर रोजी मराठा समाजाच्या वतीने गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा समाजातील नेते सुरेश पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

पोलिसांनी बजावली नोटीस

दरम्यान नाशिक पोलिसांनी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली असून, १४९  कलमाखाली ही नोटीस बजावण्यात आली आहे. मराठा आरक्षण संदर्भात आंदोलनाची भूमिका घेतल्याने खबरदारी म्हणून नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मराठा संघटना आणखी आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन सरकारला तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. या तीन दिवसांत शासनाने आपली भूमिका स्पष्ट न केल्याने नाशिकमध्ये सकल मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आंदोलनाची रणनीती ठरवण्यात आली. नाशिक येथे या बैठकीत मराठा बांधवानी आपली पुढची रणनीती ठरवल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी भाजपा आमदार देवयानी फरांदे भाषण करत असताना बैठकीत काही काळ तणाव निर्माण झाला होता. आमदार देवयानी फरांदे यांच्या भाषणाला एका गटाचा कडाडून विरोध केला होता. सकल मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीला जिल्हाभरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मराठा बांधवांनी सहभाग घेतला होता. दरम्यान मराठा आरक्षण संदर्भात पुढील रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती. त्यात मराठा समाजाच्या वतीने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्र देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच जो आमदार, खासदार शासनाला अथवा आपल्या पक्षाच्या वरिष्ठांना खुले पत्र देणार नाही. त्यांच्याविरोधात गमिनी कावा पद्धतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर यांनी दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.