मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनातील मराठा समाजाचे शिष्टमंडळ आणि राज्य सरकार यांच्यात काल मुंबई येथे बैठक झाली. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत महत्त्वाचे विधान केले आहे.
या संदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षणाला न्यायालय टिकवण्यासाठी ते अभ्यासपूर्ण असणे गरजेचे आहे.मराठा आरक्षणाचा तंतोतंत जीआर काढण्यासाठी काही अवधी मिळाला पाहिजे, अशी मागणीदेखील देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळी त्यांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जातील, असे आश्वासनदेखील शिष्टमंडळाला दिले असल्याचे सांगितले.
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आंदोलनादरम्यान राज्य सरकार आणि आंदोलनाच्या शिष्टमंडळाची बैठक रात्री उशिरा मुंबईत पार पडली. या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत झालेल्या निर्णयाचा बंद लिफाफा राज्य सरकारच्या वतीने आज मनोज जरांगे पाटील यांना देण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना सरकारचा निर्णय कळवणार आहे. त्यानंतर दुपारी बारा वाजता मनोज जरांगे पाटील आपला निर्णय जाहीर करतील.
(हेही वाचा – Maratha Reservation: मनोज जरांगे-पाटील यांच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा, पिंपरी-चिंचवडमध्ये बेमुदत उपोषण)
देवेंद्र फडणीस यांचे आश्वासन
मराठा समाजातील आंदोलकांवर जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे पोलिसांच्या वतीने लाठीचार्ज करण्यात आला होता. त्यानंतर मराठा समाजातील आंदोलकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी राज्यभरातून करण्यात आली आहे. त्यानुसार मराठा समाजातील आंतरवाली सराटी येथील सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जातील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे तसेच या आंदोलकांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्चची पूर्णतः चौकशी करून दोशींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची ग्वाही देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community