मुंबईत मराठी भाषा भवन केंद्र उभारण्यासाठी राज्यसरकारने आता मरीन लाईन येथील जागा निवडली आहे. ही जागा बालभवन येथील आहे. अत्यंत मोक्याच्या ठिकाणची ही जागा मराठी भाषा भवनासाठी देण्यात येणार आहे.
२१०४ चौ. मी. भूखंड दिला!
शाळकरी मुलांचा सर्वांगिण विकास व्हावा, याकरता पं. नेहरू यांच्या संकल्पनेतून १९५२ साली पहिले ‘बालभवन’ साकारले होते. त्यासाठी दोन मोठे भूखंड देण्यात आले. एका भूखंडावर ‘बालभवन’ची एक इमारत आहे. गिरगाव चौपाटीसमोरच असलेल्या या इमारतीत शाळकरी मुलांसाठी अनेक उपक्रम घेतले जातात. राज्यभरातील ग्रामीण, आदिवासी भागातील मुलांमधील कलागुण विकसित करण्यासाठी या बालभवनाचा वापर होत आहे. या इमारतीपासून काही अंतरावर असलेल्या दुसऱ्या भूखंडावर मुलांकरिता संग्रहालय, ऑडिटोरिअम, ग्रामीण-आदिवासी भागातून येणाऱ्या कलागुणसंपन्न विद्यार्थ्यांचे मेळावे भरविण्याची व्यवस्था करण्याची योजना होती. मात्र आता महसूल विभागाने २,१०५ चौरस मीटर इतका भूखंड ‘मराठी भाषा विभागा’अंतर्गत येणाऱ्या मराठी भाषा भवनाला दिल्याने बालभवनच्या विस्तार योजनेला कायमची मूठमाती मिळाली आहे. याआधी या भूखंडापैकी काही भागावर शालेय शिक्षण विभागानेच आपली वेगवेगळी प्रशासकीय कार्यालये थाटली.
(हेही वाचा : बार मालकांकडून वसूल केलेले ४.७० कोटी अनिल देशमुखांना दिले! वाझेची कबुली)
…तर भूखंड परत घेणार!
महसूल विभागाने भूखंड देताना येत्या पाच वर्षांत या जमिनीचा वापर करण्याचे बंधन मराठी भाषा विभागावर घातले आहे. विभागाला ही जमीन इतर कारणांकरिता वापरता येणार नाही. तसेच बीओटी, पीपीपी अथवा खासगी सहभागातून विकसित करावयाची असल्यास वा पोटभाडय़ाने द्यावयाची असल्यास त्याकरिता महसूल विभागाकडून परवानगी घ्यावी लागेल. अन्यथा हा भूखंड महसूल विभागाकडून ताब्यात घेतला जाईल.
Join Our WhatsApp Community