चर्नी रोड येथील जवाहर बाल भवन येथे उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवनासाठी ६१ लाख रुपये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) वितरित करण्याचा निर्णय राज्याच्या मराठी भाषा विभागाने घेतला आहे. वास्तविक, एमआयडीसीमार्फत मराठी भाषा भवन उभारण्याची मूळ योजना होती, पण आता मराठी भाषा विभागानेच एमआयडीसीला निधी दिली आहे.
प्रकल्पावर १२६ कोटी रुपये खर्च करण्याची मूळ योजना
जवाहर बाल भवन येथील शालेय शिक्षण विभागाचा मोकळा भूखंड मराठी भाषा विभागास देण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या काळात झाला. या ठिकाणी सुमारे दोन हजार १०० चौरस मीटर जागेवर मराठी भाषा भवनाची वास्तू उभी राहणार आहे. या प्रकल्पावर १२६ कोटी रुपये खर्च करण्याची मूळ योजना आहे. या मराठी भाषा भवनात २०० आसन क्षमतेचे बहुउद्देशीय सभागृह, १४५ प्रेक्षकांची क्षमता असलेले अॅम्फी थिएटर, प्रदर्शनाचा हॉल अशी योजना आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन झाले होते. दोन वर्षांत हे मराठी भाषा भवन पूर्ण करण्याची महाविकास आघाडी सरकारची योजना होती. आता शिंदे सरकारनेही भाषा भवनाला गती दिली आहे.