मराठी नाट्य विश्वाचे बांधकाम अडवले कुणी? चार महिन्यांनंतरही बांधकामाला नाही सुरुवात

122

गिरगाव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या वास्तूचा पुनर्विकास करून ज्या जागेत मराठी नाट्य विश्व आणि मराठी रंगमंच कलादालन निर्माण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आणि महापालिकेच्या माध्यमातून या वास्तूचे काम करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदाराचीही निवड केली. मात्र, या मराठी नाट्य विश्वाच्या निर्माणात एका अमराठी माणसानेच खोडा घातल्याची माहिती समोर येत आहे. या बिर्ला क्रीडा केंद्राच्या जागेचा ताबा अमराठी असलेल्या ठक्कर कॅटरर्स याकडे असून त्यांच्याकडून जागा खाली करून देण्यास टाळाटाळ होत असल्याने प्रत्यक्षात या बांधकामाला सुरुवात झालेली नाही. जागा खाली न केल्याने बांधकामाला विलंब होत असल्याची माहिती मिळत आहे.

एकत्रित प्रकल्प उभारण्यात येणार

गिरगाव येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या जागेवर सुमारे ३ लाख ५० हजार चौरस फूट क्षेत्रावर दोन टप्प्यांमध्ये, मराठी रंगमंच कला दालनासाठी एकमेवाद्वितीय अशा स्वरूपात पुनर्विकास करून तिथे ‘मराठी नाट्य विश्व’ या नावाने नाट्यगृह व मराठी रंगभूमी संग्रहालय असा एकत्रित प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मराठी नाट्य विश्वाची संकल्पना प्रत्यक्षात साकारली जात असून याच्या बोधचिन्हाचे अनावरण मे महिन्यांमध्ये राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी पार पडले होते.

(हेही वाचा सफाई कामगारांच्या दूरदृष्टीकडे महापालिकेचे लक्ष)

वास्तूच्या बांधकामासाठी १५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार

या भुखंडाची मालकी राज्य सरकारकडे आहे. काही वर्षांपूर्वी हा भूखंड तुकडा राज्य सरकारने महापालिकेला भाडेतत्वावर दिला होता. त्यानंतर या जागेवर बिर्ला क्रीडा केंद्राची वास्तू बिर्ला समुहाने बनवले आणि सभागृह महापालिकेला सुपूर्द केला होता. कालांतराने ही वास्तू जुनी झाल्याने तसेच वापरात नसल्याने पडून राहिल्याने या जागी मराठी नाट्यविश्व उभारण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने तयार केला आणि त्यासाठी शासनाच्यावतीने खर्च करण्याची तयारीही दर्शवली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दोन दोन तळ मजले अधिक तीन मजली इमारतीचे टेरेस फ्लोअरसह काम करण्यात येणार आहे. त्यात तळ मजल्यावर पार्किंगची व्यवस्था, पहिल्या मजल्यापासून तिसऱ्या मजल्यापर्यंत मराठी नाट्य विश्वाशी निगडीत बांधकाम करण्यात येणार आहे, सुमारे ६०० आसन क्षमतेचे हे नाट्यगृह असून १५० आसनी एम्पिथिएटर, कॅफेटेरिया, गच्चीवर बगीचा व खुला रंगमंच, मराठी रंगभूमीचे कलादालन अशा बाबींचा समावेश आहे. या वास्तूच्या बांधकामासाठी सुमारे १५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून या कामांसाठीच्या कंत्राट कामांच्या प्रस्तावाला प्रशासकांची मंजुरी प्राप्त झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकल्प कामासाठी मनिषा प्रोजेक्ट्स, सी.ई.इन्फा आणि आर अँड बी या एमसीआर जेव्ही या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंत्राट कामाच्या प्रस्तावाला जून महिन्यात प्रशासकांनी मान्यता दिली. परंतु चार महिने उलटत आले तरी या नाट्य विश्वाच्या बांधकामाला सुरुवात झालेली नाही. या वास्तूचे दोन टप्प्यात विकास केला जाणार आहे. त्यामध्ये वास्तूचे बांधकाम आणि अंतर्गत सजावट बांधकाम अशांचा समावेश असून यामध्ये कोणते साहित्य असावे यासाठी शासनाने एक कमिटी नियुक्त केली आहे. यामध्ये अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह नाट्य कलावंताचाही समावेश आहे. या कमिटीच्या सुचनेनुसारच अंतर्गत बांधकामाचा आराखडा तयार केला जाणार आहे.

शासनाकडून १ कोटी रुपये यापूर्वीच प्राप्त झाले

मात्र, मिळालेल्या माहितीनुसार बिर्ला क्रीडा केंद्राची जागा ठक्कर कॅटरर्सला भाडेपट्टयावर दिलेली असून त्यांच्याकडून ही जागा रिकामी करून देण्यास टाळाटाळ होत असल्याने महापालिकेला या जागेवर नाट्य विश्वाच्या इमारतीचे काम करता येत नाही. भाडेपट्टयावर दिलेल्या ठक्कर कॅटरर्सने महापालिकेला अट घातली असून त्यामध्ये त्यांनी या वास्तूचे बांधकाम झाल्यानंतर पुन्हा आपल्यालाच भाडेपट्ट्यावर जागा मिळावी. या अटीवरच ठक्कर कॅटरर्स हे जागा सोडण्यास तयार आहे. मात्र, ही जागा शासनाची असल्याने महापालिकेने ही मागणी शासनाने पाठवली आहे. मात्र, शासनाचा निर्णय येईपर्यंत ही संस्था जागा सोडत नसल्याने याठिकाणी चार महिने उलटूनही कोणतेही बांधकाम करता आलेले नाही. विशेष म्हणजे हा तिढा न सुटल्याने महापालिकेने मंजूर केलेल्या कंत्राटदारांना कार्यादेश दिले नसल्याचीही माहिती मिळत आहे. या वास्तूचा खर्च राज्य शासनाच्यावतीने केला जाणार असल्याने शासनाकडून १ कोटी रुपये यापूर्वीच प्राप्त झाले आहेत. या बांधकामामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या संस्थेला महापालिकेच्या आयुक्तांसह कोणीही त्यांना रितसर बाहेरचा रस्ता दाखवून मराठी नाट्य विश्वाच्या बांधकामाला गती देण्यासाठी पुढाकार घेताना दिसत नाहीत. त्यामुळे मराठी नाट्य विश्वाच्या बांधकामाला सुरुवात होण्यापूर्वी महापालिकेला गुंडाळण्याचा निर्धार केला की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.