सोमवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबईतील मरीनड्राइव्ह आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे फटाके फोडताना आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले.
(हेही वाचा – जगातील ‘सर्वात घाणेरडा व्यक्ती’चा मृत्यू; 65 वर्षांपूर्वी केलेली अखेरची आंघोळ, काय आहे कारण?)
ध्वनी प्रदूषणाविरोधात लढणाऱ्या आवाज फाउंडेशन या पर्यावरणप्रेमी संस्थेने सायंकाळनंतर दोन्ही ठिकाणी आवाजाची तपासणी केली असता मरीनड्राइव्हला सर्वात जास्त आवाज झाल्याचे पाहायला मिळाले. मरीनड्राइव्ह परिसरात आवाजाची मर्यादा 109.1 डेसिबलपर्यंत पोहोचली. दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी रात्री दहानंतर फटाके फोडायला बंदी आहे. आवाज फाउंडेशनच्या सर्वेक्षणात छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे रात्री पावणेदहा वाजता 103.4 डेसिबल आवाजाची मर्यादा पोहोचली.
रात्री साडेदहा ते पावणेबारा दरम्यान मरीन ड्राईव्हला 109.1 डेसिबलपर्यंत आवाजाची मर्यादा पोहोचली. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. तरीही दोन तास सलग फटाके वाजत होते, अशी तक्रार आवाज फाउंडेशनच्या संस्थापिका सुमैरा अब्दुलली यांनी केली. रात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात 107 डेसिबलपर्यंत आवाजची मर्यादा पोहोचली, त्यानंतरही फटाके फोडले जात होते, अशी तक्रार अब्दुलली यांनी केली.