तामिळनाडूमधील (Tamil Nadu) कृष्णगिरी जिल्ह्यात असलेल्या टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड (Tata Electronics manufacturing unit) कंपनीत दि. २८ सप्टेंबर रोजी पहाटे भीषण आग लागली. प्लांटच्या सेलफोन उत्पादन विभागात झालेल्या स्फोटनंतर आग लागल्याची माहिती मिळत आहे. या कारखान्यात आग लागली तेव्हा तिथे १५०० कर्मचारी कामावर होते.
मात्र प्लांटला आग लागल्यानंतर कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने तीन कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. यावेळी घटनास्थळी १०० हून अधिक पोलिस तैनात होते.
टीईपीएल कंपनीत आयफोनसाठी (IPhone) अॅक्सेसरीज बनवले जातात. या कंपनीत सुमारे ४५०० कर्मचारी काम करतात. यामध्ये बहुतांश महिला कर्मचारी असून सेलफोन अॅक्सेसरीजच्या पेंटिंग युनिटमध्ये ही आग लागली. दरम्यान कंपनीत लागलेली आग विझवण्यासाठी होसूर(Hosur) ,कृष्णगिरी आणि जवळपासच्या अनेक अग्निशमन केंद्रातून सात अग्निशमन गाड्या मागवण्यात आल्या होत्या. त्यामुळे अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे आगीवर लवकर नियंत्रण मिळवता आला. मात्र आयफोन (IPhone) तयार करणारी ही कंपनी ५०० एकरमध्ये पसरलेली असल्याने आगीनंतर काळ्या धुराचे ढग निघत होते.