मुंबईच्या (Mumbai) अंधेरी (Andheri) पश्चिमेकडील रिया पॅलेस या १४ मजली इमारतीत आज (१६ ऑक्टोबर) सकाळी अचानक आग लागल्याने तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना लोखंडवाला कॉम्प्लेक्सजवळील क्रॉस रोड नंबर ४ येथे घडली. सकाळी ८ च्या सुमारास इमारतीच्या १० व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग लागली, त्यामुळे परिसरात गोंधळ उडाला.
(हेही वाचा – मशिदीत जय श्रीराम म्हटल्याने धार्मिक भावना दुखावत नाहीत; Karnataka High Court चा निर्वाळा)
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी आग विझवण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले आणि तब्बल एक तासानंतर म्हणजेच साधारण ९ च्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. मात्र, या आगीत तीन रहिवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये चंद्रप्रकाश सोनी (वय ७४), कांता सोनी (वय ७४), आणि पेलूबेटा (वय ४२) यांचा समावेश आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या घटनेची गंभीर चौकशी केली जात असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग लागताच इमारतीतील रहिवाशांनी त्वरित बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. परंतु १० व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये अडकलेल्या तिघांचा जीव वाचवता आला नाही.
आगीच्या दुर्घटनांमध्ये वाढ
काही दिवसांपूर्वी माहीममधील मोहित हाइट्स नावाच्या इमारतीत देखील अशीच आग लागली होती. चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये लागलेल्या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र त्या आगीत घरातील सर्व सामान जळून खाक झाले आणि काही रहिवासी अडकले होते. त्यांची सुरक्षित सुटका अग्निशमन दलाने केली होती. मुंबईतील रहिवासी इमारतींमध्ये सातत्याने आग लागण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या दुर्घटनांमुळे रहिवाशांच्या सुरक्षेच्या उपायांबद्दल अधिक दक्षता बाळगण्याची आवश्यकता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community