कोल्हापुरातील गोकुळ-शिरगाव एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग लागल्याचे समोर आले आहे. एमआयडीसीतील रसायन कंपनीला ही आग लागली असून संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहे. त्यामुळे कंपनीतून आगीचे धुराचे लोट आजूबाजूच्या परिसरात पसरले आहेत. या आगीमागचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.
माहितीनुसार, गोकुळ-शिरगावमधील एमआयडीसीतील शेरा प्लस कंपनीला ही भीषण आग लागली आहे. या कंपनीत रसायनाचे गोडाऊन होते. या भीषण आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या अग्नितांडवावर नियंत्रण मिळवण्याचे काम अग्निशमन दलाकडून सुरू आहे. आग खूप मोठी असल्यामुळे अग्निशमन दलाला आग विझवताना नाकेनऊ येत आहेत. कारण आग वाढत असल्याचे सांगितले जात आहे. या आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. यासंदर्भातील तपास अग्निशमन दल आणि पोलिसांकडून केला जात आहे.
तसेच ही आग शेजारील असलेल्या इतर कंपन्यांना लागू नये, याची विशेष काळजी घेतली जात आहे. माहितीनुसार, विमानतळ अग्निशमन दल, कोल्हापूर महानगर पालिकेचे अग्निशमन दल, शाहू साखर कारखान्याचे अग्निशमन दल असे सर्वजण एकत्र येऊन या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या कंपनीत रसायन असल्यामुळे आग वाढत आहे. आतापर्यंत या आगीत कोणतीही जीवितहानी झाली असून कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचा – हिमाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के; 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप)