-
सचिन धानजी,मुंबई
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून मुंबईतील माटुंगा पूर्व आणि मुंबादेवी मंदिर परिसरात अत्याधुनिक पध्दतीची एलिवेटेड मल्टीलेवल मॅकेनिकल कार पार्किंगची सुविधा उभारण्याचा निर्णय घेत कंत्राटदारांची निवड केली. परंतु माटुंगा येथील प्रस्तावित वाहन तळाच्या कामाला सर्व प्रकारच्या परवानगी मिळूनही केवळ तीन झाडांमुळे हा प्रकल्प अडकला गेला आहे. या वाहनतळासाठी पर्यावरण आणि रेल्वेची परवानगी मिळूनही केवळ तीन झाडे कापण्यासाठी आयुक्तांच्या स्तरावरील परवानगी प्रलंबित असल्याने स्थानिकांच्या विरोधामुळे याला विलंब केला जातो की प्रशासनच जाणीवपूर्वक झाडे कापण्यास परवानगी न देता या विलंब करतो असा प्रश्न निर्माण झाला आहे. (Matunga Car Parking)
(हेही वाचा- “देशातील प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक…”, Dr. Manmohan Singh यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया)
मुंबईतील वाहनतळांच्या अपुऱ्या संख्येमुळे अनेक वाहने रस्त्यांवर बेशिस्तपणे उभी केली जातात, परिणामी रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. तसेच रस्त्यांवर उभ्या केलेल्या वाहनांना टोविंग करत नेले जात असल्याने नागरिकांना होत असलेल्या या वाहनतळाच्या समस्येबाबत महापालिकेने आता अत्याधुनिक पध्दतीची वाहनतळे बनवण्याचा निर्णय घेतला. ज्यामध्ये माटुंगा पूर्व रेल्वे स्थानकासमोरील मोकळी जागा, हुतात्मा चौक शेजारी जागा आणि काळबादेवी मुंबादेवी मंदिराजवळील मोकळी जागा निश्चित केल्या होत्या. त्यातील माटुंगा आणि मुंबादेवीच्या दोन जागा अंतिम करून त्याठिकाणी एलिवेटेड मल्टीलेवल मॅकेनिकल कार पार्किंगकरता १६ जून २०२२ रोजी निविदा मागवल्या आणि दोन्ही कामांसाठी प्रत्येकी कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. (Matunga Car Parking)
माटुंगा मध्य रेल्वेच्या समोरील १५१८ चौरस मीटरच्या मोकळ्या जागेत १८ मजली अशाप्रकारे ४७५ वाहनांची क्षमता असलेले वाहनतळ उभारले जाणार आहे, सध्या पोलिस चौकी असलेल्या जागेसह मोकळ्या जागेवर हे वाहनतळ उभारले जात असून सन २०२२मध्ये याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर डिसेंबर २०२२मध्ये याचे कार्यादेश बजावले होते. यासाठीच्या सर्व प्रकारच्या परवानगी प्राप्त झाल्यानंतर १५ महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्यानुसार सर्व प्रकारच्या परवानगी प्राप्त झाल्यानंतर माटुंगा पोलिस बीट चौकी२ शेजारी असलेली तीन झाडे कापण्यास महापालिकेचीच परवानगी मिळालेली नाही. (Matunga Car Parking)
(हेही वाचा- Dr. Manmohan Singh यांच्या निधनानंतर ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर)
महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, याला स्थानिकांचा विरोध असला तरी या भागातील जनतेला वाहनतळाची सुविधा देण्यासाठी हे काम हाती घ्यावेच लागेल. आज जरी काही लोकांचा विरोध असला तरी प्रत्यक्षात हे वाहनतळ उभारल्यानंतर अनेकांना याचा फायदा होऊ शकतो. माटुंगा परिसरातील अनेक रस्ते अरुंद असून त्यांची वाहने रस्त्यावरच उभी असतात,परिणामी रहिवाशांना यामुळे वाहतूक कोंडीचा तसेच आपली उभी करण्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे येथील रहिवाशांसाठी एक महत्वपूर्ण अशी सूविधा मिळू शकते,असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Matunga Car Parking)
मुंबईतील भविष्यातील वाहनांची वाढणारी संख्या लक्षात घेता वाहनतळांची उभारणी केली जात आहे आणि त्याचाच हा भाग आहे. त्यामुळे या माटुंग्यातील या वाहनतळासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरण, रेल्वे प्रशासन यासह आवश्यक परवानगी प्राप्त झाल्या आहेत, मात्र, येथील तीन झाडे कापल्याशिवाय या प्रकल्पाचे काम हाती घेता येणार नाही. ही तिन्ही झाडे कापण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाची परवानगी आवश्यक आहे, ही परवानगी प्राप्त झाल्यानंतर तिन्ही झाडे कापून अथवा अन्यत्र पुनर्रोपित करून या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले. (Matunga Car Parking)
(हेही वाचा- आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ आणि माजी पंतप्रधान Manmohan Singh यांची अशी आहे कारकीर्द)
दरम्यान, या प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध दर्शवलेला असून मनसेच्या सरचिटणीस स्नेहल जाधव यांच्या नेतृत्वाखालील मनसेने याला विरोध करून स्थानिकांचा विरोध दर्शवण्यासाठी स्वाक्षरी मोहिम राबवली आहे. तर काही दिवसांपूर्वी कमलाकर शेणॉय यांनीही याला विरोध दर्शवला होता. मात्र, त्यांचा हा विरोध असला तरी त्यांना या प्रकल्पाचे महत्व आणि त्यांच्या मनातील शंका दूर करून हा प्रकल्प साकारण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे महापालिकच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Matunga Car Parking)
रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता गिरीश निकम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माटुंगा येथील वाहनतळासाठी आवश्यक परवानगी प्राप्त करण्यास विलंब झाल्यामुळे कामाला अद्याप कामाला सुरुवात झाली नव्हती, पण आता यासाठीच्या आवश्यक त्या सर्व परवानगी प्राप्त झाल्या आहेत, केवळ वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात पुढील कार्यवाही करून प्रकल्प कामाला सुरुवात होईल. (Matunga Car Parking)
(हेही वाचा- Boxing Day Test : विराट कोहलीला यापूर्वी कधी गैरवर्तणुकीसाठी दंड झाला होता?)
माटुंगा पूर्व, मध्य रेल्वे स्थानकासमोर
प्रस्तावित वाहनतळाची क्षमता : ४७५
वाहतळाचे बांधकाम : तळ अधिक १० मजले, आणि तळ अधिक २० मजले
बांधकामाचा प्रकार : रोबोटिक वाहनतळ, अत्याधुनिक पध्दतीने चार लिफ्टचा वाहनांसाठी वापर
बांधकामाचा कालावधी : पावसाळ्यासह १५ महिने
हमी कालावधी : ५ वर्षे
देखभाल कालावधी : पुढील २० वर्षे
हेही पहा-
Join Our WhatsApp Community