माटुंगा रेल्वे वर्कशॉपची संरक्षक भिंत कोसळून नाल्यालगत असलेल्या ९ ते १० झोपड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे या वर्कशॉपची भिंत नाल्यात कोसळली. परंतु या भिंतीवर वाढलेले मोठे झाडे ही तेथील रहिवाशांच्या घरांवर गेली. या झाडांमुळे येथील नाल्यालगतच्या सुमारे ९ ते १० घरांचे मोठे नुकसान झाले. आधीच लॉकडाऊनमुळे येथील गरीब कुटुंबांवर नोकरीधंद्यांची मोठी पंचाईत झालेली आहे, त्यातच आता पावसाळ्याच्या तोंडावर या घरांचे नुकसान झाल्याने जीवन जगायचे कसे, असा प्रश्न येथील रहिवाशांवर पडला आहे.
घरांचे छत, भिंती कोसळल्या!
माटुंगा पश्चिम रेल्वे स्थानकासमोरील पश्चिम रेल्वे अधिकारी वसाहत आणि कमला रामन नगर येथून दादर-धारावी नाला जात असून या नाल्याच्या एका बाजुला सेंट्रल माटुंगा रेल्वे वर्कशॉपची संरक्षक भिंत आहे, तर दुसऱ्या बाजुला कमला रामन नगर वसाहतीतील काही घरे वसलेली आहेत. परंतु मागील १६ व १७ मे २०२१ रोजी झालेल्या ‘तौत्के’ या चक्रीवादळाने या वर्कशॉपची संरक्षक भिंत खचून नाल्यात पडली. परंतू या भिंतीवर मोठ्या आकाराची वड, पिंपळ, जांभूळ तसेच अन्य जातीची झाडे असल्याने ही झाडे नाल्यालगत वसलेल्या झोपड्यांवर तसेच सार्वजनिक शौचालयांवर जावून पडली. त्यामुळे सार्वजनिक शौचालयांसह आसपासच्या ९ ते १० घरांचे नुकसान झाले आहे. या घरांचे मोठे नुकसान झाले असून त्यामध्ये घरांचे सिमेंट पत्रे तसेच घरांच्या भिंतीं कोसळल्या गेल्या आहेत, तर काहींच्या भिंतींना तडे गेले आहेत.
(हेही वाचा : अबब… ३० लाख मृत्यू! कोरोना नव्हे जागतिक महायुद्धच!)
उर्वरित भिंतही धोकादायक!
स्थानिक नगरसेविका हर्षला आशिष मोरे यांनी याबाबत बोलतांना चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आली असल्याचे सांगितले. परंतु या पाहणीनंतर भिंत अजूनच खचली आणि झाडांमुळे येथील घरांचे तसेच सार्वजनिक शौचालयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नव्याने झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात येत आहे. मात्र, रेल्वेची जी भिंत कोसळली, ती अत्यंत धोकादायकच आहे. आज त्याचा काही भाग कोसळला असला तरी उर्वरीत भिंतही धोकादायक असल्याने त्यापासूनही धोका आहे. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून रेल्वेशी पत्रव्यवहार करून या धोकादायक भिंतीवरील आधी झाडे कापून त्यावरील भार हलका करण्याचा प्रयत्न केला जाईल, तसेच ही भिंत कायमस्वरुपी नव्याने बांधण्यासाठीही पाठपुरावा केला जाईल, असे स्पष्ट केले.
झाडांमुळे झाली भिंत कमकुवत
रेल्वे वर्कशॉपची संरक्षक भिंतीवर उगवलेली झाडे कापण्यात रेल्वे प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष केले गेले. ही झाडे प्रारंभीच तोडून टाकण्याचा प्रयत्न झाला असता तर भिंत सुस्थितीत राहिली असती. तसेच भिंतीवर वाढलेल्या या झाडांमुळे येथील घरांना धोका निर्माण झाल्याच्याही तक्रारी अनेकदा महापालिकेकडे स्थानिकांनी केल्या होत्या. परंतु ना रेल्वेने या तक्रारींकडे लक्ष दिले ना महापालिकेने. यापूर्वी या भिंतीवर चढून झाडांच्या फांद्या तोडल्या जायच्या. परंतु मागील काही वर्षांपासून या झाडांच्या फांद्यांची छाटणीही झाली नव्हती. त्यामुळे झाडांच्या भारामुळे ही भिंत कोसळली आहे. या भिंत पडल्यानंतर तात्काळ झाडांच्या फांद्यांची छाटणी वेळेवर करण्यात आली असती तर सध्या यामुळे झालेले नुकसान टाळता आले असते.
Join Our WhatsApp Community