महाराष्ट्रात सोयाबीनची सर्वाधिक खरेदी; पणन मंत्री Jaykumar Rawal यांची माहिती

27
महाराष्ट्रात सोयाबीनची सर्वाधिक खरेदी; पणन मंत्री Jaykumar Rawal यांची माहिती
  • प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याने इतर सर्व राज्यांपेक्षा सर्वाधिक प्रमाणात सोयाबीनची खरेदी हमीभावाने केली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की, दि. ६ फेब्रुवारी २०२५ अखेर राज्यातील ५,११,६५७ शेतकऱ्यांकडून एकूण ११,२१,३८५ मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे.

सोयाबीनच्या साठवणुकीची समस्या

राज्यात मोठ्या प्रमाणावर खरेदी झाल्यामुळे साठवणुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. खरेदी केलेला सोयाबीन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या ३४५ गोदामांत तसेच २५२ खाजगी भाडेतत्त्वावरील गोदामांत साठवण्यात आला आहे. मात्र, मोठ्या प्रमाणावर खरेदी झाल्यामुळे ही सर्व गोदामे भरली असून, पुढील व्यवस्थापन कसे करायचे, यावर प्रशासन विचार करत आहे.

(हेही वाचा – Kashmiri Hindu यांच्यासाठी ‘पनून कश्मीर’ नावाचा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश तयार करण्याची मागणी)

हमीभावात वाढ – शेतकऱ्यांना दिलासा

केंद्र शासनाने २०२४-२५ या हंगामासाठी सोयाबीनसाठी प्रति क्विंटल ४,८९२ रुपये हमीभाव निश्चित केला आहे, जो मागील वर्षाच्या हमीभावापेक्षा २९२ रुपयांनी अधिक आहे. शेतकऱ्यांना हमीभावाचा अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी केंद्र शासनाच्या नाफेड (NAFED) व एनसीसीएफ (NCCF) या नोडल एजन्सींच्या माध्यमातून राज्यातील सहा नोडल एजन्सीद्वारे शेतकरी नोंदणी आणि खरेदी प्रक्रिया राबवण्यात आली.

राज्यात ५६२ खरेदी केंद्रे कार्यरत

राज्यात सोयाबीन खरेदी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नाफेडमार्फत ४०३ आणि एनसीसीएफमार्फत १५९ अशी एकूण ५६२ खरेदी केंद्रे कार्यरत ठेवण्यात आली होती. या केंद्रांवर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी सहभाग घेतला.

(हेही वाचा – International Film Festival : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांना राज्य शासनाचे पाठबळ)

खरेदीसाठी दोनदा मुदतवाढ

राज्यातील शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळावा म्हणून दि. १ ऑक्टोबर २०२४ पासून ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरू करण्यात आली, तर दि. १५ ऑक्टोबर २०२४ पासून प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खरेदीसाठी ९० दिवसांची मुदत १२ जानेवारी २०२५ पर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र, शेतकऱ्यांची मागणी आणि मोठ्या प्रतिसादामुळे खरेदी प्रक्रियेस प्रथम ३१ जानेवारी २०२५ आणि नंतर ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

शेतकऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद

सोयाबीन खरेदी प्रक्रियेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. ५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी हमीभावाच्या योजनेचा लाभ घेतला. महाराष्ट्र राज्याने देशातील इतर सर्व राज्यांपेक्षा अधिक सोयाबीन खरेदी करून राष्ट्रीय स्तरावर पहिला क्रमांक मिळवला आहे. पणन विभागाच्या नियोजनामुळे ही प्रक्रिया सुरळीत पार पडली असून, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.