Burger King Ditches Tomato : बर्गर किंगच्या बर्गरमधून टोमॅटो गायब

कंपनीला किफायतशीर किमतीबरोबरच मालाच्या दर्जाचीही भेडसावतेय चिंता

195
Burger King Ditches Tomato : बर्गर किंगच्या बर्गरमधून टोमॅटो गायब
Burger King Ditches Tomato : बर्गर किंगच्या बर्गरमधून टोमॅटो गायब
  • ऋजुता लुकतुके

टोमॅटोच्या वाढलेल्या किमतींमुळे मॅकडोनाल्ड्स पाठोपाठ आता बर्गर किंगनेही बर्गरमधून टोमॅटो काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

कुठल्याही बर्ग किंगच्या आऊटलेटमध्ये गेलात तर तुम्हाला एक वाक्य दिसेल, ‘टोमॅटोलाही सुटीची गरज आहे! (even tomato needs a vacation)’ याचाच अर्थ कंपनीने आपले रॅप्स आणि बर्गरमधून टोमॅटोला सुटी दिली आहे. या फळभाजीच्या वाढलेल्या दरांमुळेच कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला हे उघड आहे.

कंपनीला किफायतशीर किमतीबरोबरच मालाच्या दर्जाचीही चिंता भेडसावतेय. ‘आम्हाला बाजारात टोमॅटो मिळत नव्हते. आणि उपलब्ध टोमॅटोचा दर्जाही चांगला नव्हता. त्यामुळे आमच्या उत्पादनाचा दर्जा घसरू नये म्हणून हा निर्णय घेत असल्याचं,’ कंपनीने ग्राहकांना कळवलं आहे.

थोडक्यात, देशातील वाढलेल्या अन्नधान्याच्या किमतीचा परिणाम सगळीकडे जाणवू लागला आहे. यापूर्वी मॅकडोनाल्ड्स आणि सब-वे या आंतरराष्ट्रीय ब्रँडनी टोमॅटोचा वापर बंद केलाच होता. आता त्यात बर्गर किंग ही कंपनीही सामील झाली आहे.

 (हेही वाचा – Monsoon Update : महाराष्ट्रासह मध्यभारतात पावसाचा जोर वाढणार)

एखादी भाजी किंवा फळ महाग झालं असेल तर त्याचा वापर कमी करणं ही हॉटेल व्यावसायिकांची जुनी सवय आहे. यापूर्वी कांदा महाग झालेला असताना हॉटेलमध्ये कांद्याऐवजी मूळ्याचे काप द्यायला सुरुवात झाली होती. जिथे जिथे कांद्याला दुसरा पर्याय असेल तिथे तो पर्याय वापरला जात होता. पण, आंतरराष्ट्रीय ब्रँडनी आतापर्यंत असा निर्णय घेतला नव्हता. बर्गर किंगची देशात ४००च्या वर आऊटलेट्स आहेत.

देशात अन्नधान्याची महागाई जानेवारी २०२० नंतर आता सर्वोच्च पातळीवर आहे. किरकोळ महागाई दर साडेसात टक्क्यांच्या जवळ पोहोचलाय. त्यामुळे व्यावसायिकांनाही अशी पावलं उचलण्याची वेळ आली आहे. सब-वने ते सँडविचबरोबर देत असलेले चीज स्लाईस देणंही बंद केलंय.

याउलट डॉमिनोज् या पिझ्झा उत्पादक कंपनीने महागाईशी झुंजणाऱ्या ग्राहकांसाठी सवलतीच्या दरात पिझ्झा उपलब्ध करून दिला आहे. ४९ रुपयांपासून या पिझ्झ्याची किंमत सुरू होते. जागतिक स्तरावर अमेरिकन डॉलरमध्ये त्याची किंमत ६० सेंट्स इतकी आहे.

बर्गर आणि पिझ्झामधून टोमॅटो गायब झाल्यापासून ग्राहकांनी कंपन्यांच्या वेबसाईटवर प्रश्नांचा भडिमार सुरू केला आहे. बर्गर किंगच्या वेबसाईटवर एकाने विचारलंय, ‘माझ्या बर्गरमध्ये टोमॅटो का नाही?’ यावर कंपनीने या ग्राहकाला तातडीने उत्तरही दिलं आहे. ‘दर्जाशी तडजोड नको म्हणून सध्या टोमॅटो बंद केलाय. पण, शक्य होईल तितक्या लवकर तो परत आणू,’ असं आश्वासन कंपनीने दिलं आहे.

‘ग्राहकांनी समंजसपणा दाखवावा आणि थोडी सबुरी ठेवावी,’ असंही बर्गर किंगने वेबसाईटवर म्हटलं आहे. बर्गर किंगच्या प्रवक्त्यांनी मीडियाकडून येणारे प्रश्न मात्र टाळले आहेत. त्यांनी अधिकृतपणे कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.