बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज! अशी आहे व्यवस्था

गर्दी टाळण्‍यासाठी यंदा देखील मुंबई महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलावांची उभारणी केली आहे.

गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाचा गणेशोत्सव देखील ‘कोविड-१९’च्‍या पार्श्‍वभूमीवर अत्‍यंत साध्‍या पद्धतीने साजरा करण्‍याबाबतचे आवाहन मुंबई महापालिकेद्वारे नागरिकांना वेळोवेळी करण्‍यात आले आहे. या आवाहनाला मुंबईकर नागरिक अत्‍यंत सकारात्‍मक प्रतिसाद देत असून, रविवारी अनंत चतुर्दशीच्‍या निमित्ताने मुंबई महापालिकेकडून विसर्जनासाठी आवश्‍यक ती सर्व व्‍यवस्‍था करण्यात आली आहे. या व्यवस्थेंतर्गत महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये साधारणपणे २५ हजार इतक्या संख्येने संबंधीत कामगार, कर्मचारी, अधिकारी हे मुंबईकरांच्‍या सेवेसाठी विविध ठिकाणी कर्तव्यार्थ उपस्थित असणार आहेत, अशी माहिती उप आयुक्त (परिमंडळ-२) तथा गणेशोत्सव समन्वयक हर्षद काळे यांनी दिली आहे.

(हेही वाचाः विसर्जनाच्या पहिल्याच दिवशी कोविड नियमांचे झाले निर्माल्य)

कृत्रिम तलावांची उभारणी

कोविडच्‍या पार्श्‍वभू‍मीवर गर्दी टाळण्‍यासाठी यंदा देखील मुंबई महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलावांची उभारणी केली आहे. यानुसार १७३ ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली असून, आवश्यकतेनुसार विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे, फिरती विसर्जन स्‍थळे कार्यरत असणार आहेत. या व्यतिरिक्त महापालिका क्षेत्रातील ७३ ठिकाणी नैसर्गिक विसर्जन स्‍थळे असून, याठिकाणी महापालिकेद्वारे आवश्यक ती व्यवस्था असणार आहे, असे काळे यांनी सांगितले.

(हेही वाचाः कृत्रिम तलावांकडे वळू लागले भाविक! दीड दिवसांच्या इतक्या मूर्तींचे विसर्जन)

७१५ जीवरक्षकांची नेमणूक

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महापालिकेद्वारे विविध सेवासुविधा उपलब्‍ध करुन देण्यात येत आहेत. चौपाट्यांसह विविध नैसर्गिक व कृत्रिम विसर्जन स्‍थळी ७१५ जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी येणारे वाहन समुद्र किना-यावरील भुसभुशीत रेतीमध्ये अडकू नये, यासाठी नैसर्गिक विसर्जन स्थळी ५८७ ‘स्टील प्लेट’ची व्‍यवस्‍था करुन तात्पुरते वाहनमार्ग तयार करण्यात आले आहेत. याचबरोबर विविध ३३८ निर्माल्य कलश, १८२ निर्माल्य वाहन, १८५ नियंत्रण कक्ष, १४४ प्राथमिक उपचार केंद्र, ३९ रुग्णवाहिका इत्यादींची व्यवस्था करण्यात आली आहे.

(हेही वाचाः बाप्पासोबत सोन्याचा मुकुटही झाला विसर्जित… पुढे काय झाले? वाचा)

अशीही आहे तयारी

या व्यतिरिक्त १४५ स्वागतकक्ष, ८४ तात्पुरती शौचालये, ३ हजार ७०७ फ्लड लाईट, ११६ सर्च लाईट, ४८ निरीक्षण मनोरे आणि नैसर्गिक विसर्जन स्थळांच्या ठिकाणी ३६ मोटर बोट व ३० जर्मन तराफा इत्‍यादी सेवा-सुविधा व साधनसामुग्रींचीही व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. तसेच विविध ठिकाणी सरंक्षण कठड्यांच्या व्‍यवस्‍थेसह विद्युत व्यवस्था देखील आवश्यकतेनुसार करण्‍यात आली आहे.

(हेही वाचाः सार्वजनिक उत्सव मंडळांमधील उत्साह मावळतोय का?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here