सानुग्रह अनुदानाचा महापालिका प्रशासन आणि महापौरांना विसर

कोविड काळात जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या आणि कोविड नियंत्रणात आल्यानंतर स्वत:ची पाठ ज्या कर्मचाऱ्यांच्या योगदानावर प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष थोपटून घेत आहे,त्यांना दिवाळी भेटीचा विसर कसा पडतो असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.

77

दीपावलीला अवघे काही आठ ते दहा दिवस शिल्लक राहिलेले असताना अद्यापही महापालिकेने कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केलेली नाही. मागील वर्षी ५०० रुपयांची वाढ करत महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० रुपयांची दिवाळीभेट जाहीर केली होती. दिवाळीच्या १५ दिवस आधी महापौरांनी ही घोषणा मागील वर्षी केली होती, परंत आता दिवाळीला अवघे आठ ते दहा दिवस शिल्लक राहिलेले आहेत. मात्र, अद्यापही प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाला यावर निर्णय घेता येत नाही.

दरवर्षी १५ ते २०  दिवस आधी होते घोषणा
येत्या १ नोव्हेंबरपासून दीपावलीला सुरुवात होत असून  या सणाकरता खरेदीची लगबग सुरु झाली. दीपावलीपूर्वीचा हा तसा शेवटचा रविवार असल्याने प्रत्येकाने खरेदीचे कार्यक्रम आखलेही आहेत. परंतु एरव्ही महापालिका कर्मचाऱ्यांना १५ ते २०  दिवस आधी दिवाळी भेट म्हणून दिल्या जाणाऱ्या सानुग्रह अनुदानाबाबत अद्यापही कोणत्याही प्रकारची घोषणा झालेली नाही किंवा त्यांच्या खात्यातही याची रक्कम जमा झालेली नाही.

(हेही वाचाः आरोग्य विभागाच्या परीक्षेचा सावळा गोंधळ थांबेना)

मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनंतरही  मिळाली कमी दिवाळी भेट
मागील दिवाळीमध्ये शिवसेनाप्रणित भारतीय कामगार सेनेने राज्याचे मुख्यमंत्र्यासमवेत बैठक घेतली होती, त्यानंतर मुख्यमंत्री यांनी याबाबत गटनेत्यांच्या सभेत निर्णय  घ्यावा अशा सूचना केल्या होत्या. त्यावेळी  शिवसेनेच्या कामगार सेना पदाधिकाऱ्यांनी १७ हजार सानुग्रह अनुदान मिळणार असल्याचे फलक सर्व ठिकाणी लावले होते. परंतु महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांना ५०० रुपयांची वाढ देत १५ हजार  ५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि याची घोषणा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली होती.

ना बैठक, ना हालचाल
परंतु यंदा कामगारांना पगाराच्या २० टक्के सानुग्रह अनुदान देण्याची मागणी दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी  २२ ऑक्टोबर २०२१ रोजी होती. परंतु  आजतागायत कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानाबाबत कोणतीही बैठक नाही कि कोणतीही घोषणा नाही. त्यामुळे प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष कर्मचाऱ्यांचे सानुग्रह अनुदान द्यायला विसले का असा प्रश्न विचारला जात आहे. कोविड काळात जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या आणि कोविड नियंत्रणात आल्यानंतर स्वत:ची पाठ ज्या कर्मचाऱ्यांच्या योगदानावर प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष थोपटून घेत आहे,त्यांना दिवाळी भेटीचा विसर कसा पडतो असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.

वर्गणी कापून घेऊ  नये
महापालिकेच्यावतीने दिल्या जाणाऱ्या देवू केलेल्या सानुग्रह अनुदानाच्या रकमेमधील ३० टक्क्यांपर्यंतची रक्कम आयकर तसेच कामगार संघटनांची वर्गणी म्हणून कापली जाते. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांच्या हाती केवळ  १० ते ११ हजार एवढीच रक्कम हाती पडते. त्यामुळे कोविडमुळे कोणत्याही कामगार संघटनांनी यातून वर्गणी कापून घेवू नये,असेही काही कामगारांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.