मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदवणाऱ्या बायोमेट्रिक हजेरी मशीन्स अनेक विभागात बंद असतानाच आता महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने नवा फतवा जारी करत बायोमॅट्रीक उपस्थिती मशीन बंद असल्यास इतर खात्यांमध्ये जाऊन उपस्थिती नोंदवू नये, असेच फर्मान काढले आहे. तसेच अशाप्रकारे नोंदवलेली उपस्थिती मान्य न झाल्यास तो सुट्टीचा दिवस म्हणून गणला जावू शकतो आणि याला कर्मचारी स्वत: जबाबदार राहील, असाही इशारा दिला आहे.
मुंबई महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने ०१ सप्टेंबर २०२३ रोजी उपभोगलेल्या रजा तथा बाह्यकाम यांची नोंद सॅप कार्यप्रणालीमध्ये आपआपल्या विभाग तथा उपविभागाने नोंद घेण्याबाबतची जबाबदारी निश्चित करण्याबाबतचे एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये कर्मचारी व अधिकाऱ्यांना या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, बायोमॅट्रीक उपस्थिती मशीन बंद असल्यास इतर खात्यांमध्ये जाऊन उपस्थिती नोंदवू नये. ही उपस्थिती मान्य न झाल्यास त्यास कर्मचारी स्वत: जबाबदार राहील.
शिवाय सकाळी बायोमेट्रीक उपस्थिती मशीन बंद असल्यास त्यादिवशी संध्याकाळी एकदाच (इन) हजेरी लावावी. कर्मचाऱ्याने कार्यालय सोडताना इन आणि आऊट दोन्ही एकाच वेळी उपस्थिती लावू नये, तसे केल्यास त्यादिवसाची नैतिक रजा, अनुपस्थिती लागेल आणि त्याला कर्मचारी स्वतः जबाबदार राहील.
कर्मचान्यांनी प्रत्येक महिन्यांची हजेरी वैयक्तिकरित्या सॅप कार्यप्रणालीमध्ये तपासावी, त्यामध्ये काही अडचणीअसल्यास मानव संसाधन विभागाशी संपर्क साधावा. आपआपल्या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे Reporting Officer, Reviewing Officer, Establishment Head, HOD हे आपल्या विभागा मार्फत अचूक नोंदविणे आवश्यक आहे. Open Entry विभागातील अधिकारी यांच्याकडून सॅप प्रणालीमध्ये मंजूर करून घेण्यात यावी. त्यासाठी स्वतंत्र नोंदवही प्रत्येक विभागाने परिरक्षित करावी.
विभागातील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या बाह्य कामाची मंजूरी नियमितपणे त्याच विभागाने करणे आवश्यक आहे. कामगार / कर्मचारी / अधिकारी यांच्या अनुपस्थितीबाबत अनुज्ञेय रजा, निवडणूक कर्तव्यार्थ नोंदी, बाहय कामाच्या नोंदी इ. बाबींच्या नोंदी सॅप कार्यप्रणालीमध्ये अद्ययावत करण्याची जबाबदारी संबंधित विभागातील मुख्य लिपिक / प्रशासकीय अधिकारी अथवा प्रशासकीय अधिकारी हे उपलब्ध नसल्यास कार्यालयीन व्यवस्थेतंर्गत इतर अधिकाऱ्यांची किंवा निकटचा पर्यवेक्षकीय अधिकारी यांची असेल.
रजेच्या अर्जावर सक्षम प्राधिकाऱ्यांची पूर्वमंजूरी घेऊन किंवा रजेवरून कर्तव्यावर हजर झालेल्या दिवशी सक्षम प्राधिकाऱ्यांची मंजूरी घेऊन सॅप कार्यप्रणालीमध्ये त्या रजेची नोंद घेण्यात यावी. संबंधित अधिकाऱ्यांनी सॅप कार्यप्रणालीमध्ये रजा मंजूर केल्यानंतर अर्जाची प्रत प्रशासकीय अधिकारी (आस्थापना) विभागामध्ये सादर करण्यात यावी. त्याशिवाय रजेचे कोणतेही अर्ज प्रशासकीय अधिकारी (आस्थापना) विभागामध्ये स्विकारण्यात येणार नाहीत,असे या परिपत्रकात नमूद केले आहे.
प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेच्या आत ANM निकाली काढण्यात याव्यात, अन्यथा आस्थापना विभागाव्दारे त्या संबंधित कर्मचाऱ्यांची कर्मचान्याची (विनावेतनी) LWP रजा सॅप कार्यप्रणालीत नोंदविण्यात येईल, या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्यात यावी, अन्यथा संबंधीत कर्मचाऱ्यांच्या रजा, बाह्य कामाची नोंद इ. माहिती विहित कालावधीमध्ये सॅप कार्यप्रणालीमध्ये दर्शविली नसल्यास अनुपस्थिती, पगारामध्ये कपात होणे यासारख्या परिणामास आपले कार्यालय जबाबदार राहील, असाही इशारा यात देण्यात आला आहे.