विशेष प्रतिनिधी,मुंबई
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईमध्ये सुरू करण्यात आलेले स्वच्छता अभियान आता केवळ मुख्यमंत्री किंवा महानगरपालिकेच्या संकल्पनेतून सुरु असलेले अभियान राहिलेले नसून त्याने लोकचळवळीचे रुप धारण केले आहे. मुंबईतील स्वच्छता पॅटर्न चांदा ते बांदा असा संपूर्ण महाराष्ट्रात राबविला जाईल, त्यातून स्वच्छ, सुंदर महाराष्ट्र घडवू, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. स्वच्छता कर्मचारी हेच मुंबईचे खरे हिरो असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन आणि प्रशासन तत्पर आहे, असे देखील ते म्हणाले.(Mcgm)
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित महा स्वच्छता अभियानाचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भारताचे प्रवेशद्वार (गेट वे ऑफ इंडिया) येथे रविवारी ३१ डिसेंबर २०२३ रोजी प्रारंभ झाला, याप्रसंगी ते जनतेला उद्देशून बोलत होते.(Mcgm)
राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार सदा सरवणकर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उद्योजक नादिर गोदरेज, माजी आमदार राज पुरोहित, उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे, उप आयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार यांच्यासह विविध मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.(Mcgm)
(हेही वाचा – Thane : ठाणे जिल्ह्यातील शाळांमध्ये ‘मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा’ अभियान राबवणार)
भारताचे प्रवेशद्वार व्यतिरिक्त वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती व उद्यान प्राणिसंग्रहालय, भायखळा; सदाकांत ढवन मैदान, नायगाव; वांद्रे रेल्वे स्थानक पश्चिम; वेसावे (वर्सोवा) चौपाटी; गणेश घाट, गोरेगाव पूर्व; स्वातंत्र्यवीर सावरकर क्रीडांगण, कुर्ला पूर्व; अमरनाथ पाटील उद्यान, गोवंडी पूर्व; हिरानंदानी संकूल, पवई; हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ड्रीम पार्क, ठाकूर गाव, कांदिवली पूर्व अशा एकूण दहा ठिकाणी महा स्वच्छता अभियान पार पडले. या महा स्वच्छता अभियानाचा मुख्य कार्यक्रम भारताचे प्रवेशद्वार येथे पार पडला. येथूनच उर्वरित नऊ ठिकाणी दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. तसेच या नऊ ठिकाणचे लोकप्रतिधी तसेच नागरिकांशी मुख्यमंत्र्यांनी थेट संवादही साधला.(Mcgm)
यांनी घेतला महा स्वच्छता अभियानात सहभाग
वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय (ई विभाग) येथून आमदार यामिनी जाधव, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव; वांद्रे रेल्वे स्थानक परिसर येथून आमदार आशिष शेलार; वर्सोवा चौपाटी येथून आमदार डॉ. भारती लव्हेकर; गणेश घाट येथून आमदार विद्या ठाकूर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ड्रीम पार्क येथून खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रकाश सुर्वे, स्वातंत्र्यवीर सावरकर क्रीडांगण येथून आमदार मंगेश कुडाळकर; अमरनाथ पाटील उद्यान येथून खासदार राहूल शेवाळे, सदाकांत धवण मैदान येथून आमदार कालिदास कोळंबकर, आमदार मनीषा कायंदे, हिरानंदानी संकूल येथून आमदार दिलीप लांडे या लोकप्रतिनिधींसह अधिकारी, शालेय विद्यार्थी, नागरिक आदी महा स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.(Mcgm)
स्वच्छता अभियान चांद्यापासून बांद्यापर्यंत राबवणार
मुख्यमंत्री शिंदे जाहीर संबोधनात पुढे म्हणाले, मुंबईतील वेगवेगळ्या कारणांनी वाढणारे एकूणच प्रदूषण लक्षात घेता मुळापासून कार्यवाही करण्याचा निश्चय केला आणि त्यातून संपूर्ण स्वच्छता अभियानाची संकल्पना सुचली. विविध विभागातील मनुष्यबळ, यंत्रसामुग्री एका विभागात एकत्र आणून एकाचवेळी संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला रस्ते स्वच्छ करणे, त्यानंतर ब्रशच्या माध्यमातून धूळ हटवून जेट स्प्रेद्वारा संपूर्ण रस्ते पाण्याने धुवून काढणे; गटारे व नाल्यांचे प्रवाह कचरा मुक्त ठेवणे, सार्वजनिक प्रसाधनगृहांची नियमित स्वच्छता व निर्जंतुकीकरण, अनधिकृत फलक काढणे अशी एक ना अनेक अंगानी कार्यवाही हाती घेतली. रस्ते धुण्यासाठी पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर केला जात आहे. हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी बांधकामांची ठिकाणे आच्छादित करण्यात आली आहेत. धूळ नियंत्रण संयत्रे लावणे अनिवार्य केले आहे. या सर्वांचे दृश्य परिणाम म्हणून मुंबई स्वच्छ दिसू लागली आहे. मुंबईतील स्वच्छतेची चळवळ विस्तारुन आता हे अभियान चांद्यापासून बांद्यापर्यंत राबवत संपूर्ण महाराष्ट्र स्वच्छ करायचा आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करुन त्यास प्रतिसाद दिला.(Mcgm)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community