मुंबईत गोवरचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना गोरेगाव आणि बोरिवलीतही गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. गोरेगावमध्ये दोन तर बोरिवलीत एकाला गोवरची लागण झाल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली. शनिवारी या दोन विभागांसह तब्बल १३ नव्या रुग्णांना गोवरची लागण झाल्याचे दिसून आले.
शनिवारी ताप व शरीरावर पूरळ दिसून आल्याचे ११६ संशयित रुग्ण पालिका अधिका-यांनी मुंबईतील वेगवेगळ्या भागांतून शोधले. मुंबईत आतापर्यंत ३ हजार ९४७ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत २९२ रुग्णांना गोवरची लागण झाल्याचे पालिकेच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले. शनिवारी ४३ रुग्णांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तर २५ रुग्णांना उपचारानंतर सोडण्यात आले.
शनिवारी मुंबईत २२१ लसीकरण सत्र वेगवेगळ्या ठिकाणी राबवण्यात आले. एम आर १ लसीकरणाची मात्रा ६८१ बालकांना दिली गेली. एमएमआर लसीची मात्रा ७५४ बालकांना दिली गेली. याव्यतिरिक्त मुंबईत १०० अतिरिक्त लसीकरण सत्रे राबवण्यात आली. त्यात एमआर१ लस २९५ तर एमएमआस लशीची मात्रा ३७४ जणांना दिली गेली.
- मुंबईतील गोवरच्या मृत्यूंची निश्चित संख्या – ८
- संशयित गोवरबाधित रुग्णांची संख्या – २
- मुंबईबाहेरील रुग्णांचा मृत्यू – ३