मुंबईत दर दिवसाला गोवरबाधितांचा आकडा वाढत असून, बुधवारच्या नोंदणीत मुंबईतील गोवरबाधित रुग्णांची संख्या १६४वर पोहोचली. वाढत्या रुग्णसंख्येवर उपाययोजना आणि लसीकरणाबाबत माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका अधिका-यांची गुरुवारी तातडीने बैठक बोलावली आहे. गोवंडीत रुग्णसंख्या वाढत असल्याने या भागांतील ब-याचशा लहान मुलांना लसीकरणाच्या दोन्ही मात्रा मिळालेल्या नसल्याने याबाबत गुरूवारी चर्चा होणार आहे.
( हेही वाचा : राहुल गांधींच्या यात्रेला भारत जोडो नव्हे, ‘भारत छोडो’ नाव द्या; मुख्यमंत्र्यांची टीका)
गोवरशी संबंधित ताप आणि पूरळ ही दोन प्रमुख लक्षणे असलेल्या १ हजार ७९ मुलांना पालिका अधिका-यांनी शोधून काढले आहे. मुंबईत एम-पूर्व विभागासह, ई, एफ-उत्तर, जी-दक्षिण, पी-उत्तर आणि एच-पूर्व या आठ विभागांत गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून दाट लोकवस्ती असलेल्या मुंबईतील २४ विभागातील वॉर्डांमध्ये आता आशा सेविकांना घरोघरी गोवरचे संशयित रुग्ण शोधण्यासाठी पाठवले जाणार आहे. आरोग्य स्वयंसेविका, आशा, सहाय्यक प्रसेविकांना ताप व पूरळचे रुग्ण शोधण्याचे प्रशिक्षण दिल्याचा दावा पालिका आरोग्य विभागाने केला. या सर्वांना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अ जीवनसत्त्वाच्या दोन्ही मात्रा देणे तसेच संशयित गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचेही प्रशिक्षण दिल्याचेही पालिका आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले. गोवंडीत मोठ्या प्रमाणात लसीकरण व्हावे, यासाठी क्षेत्रीय भेटीसाठी मोबाईल व्हॅन सुरु करण्यात आली आहे. तथापि गोवंडीतील शिवाजी नगर येथील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात सौम्य लक्षणांसाठी विलगीकरण कक्ष सुरु करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती पालिका अधिका-यांनी दिली.
- व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची संख्या – ४
- डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या – २९
या रुग्णालयात होणार गोवरबाधितांचे उपचार –
रुग्णालये – खाटांची संख्या
- शताब्दी रुग्णालय , कांदिवली – २ (सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी)
- शताब्दी रुग्णालय , गोवंडी – १० (गंभीर अवस्थेतील रुग्णांसाठी)
- राजावाडी रुग्णालय, घाटकोपर – ५ (गंभीर अवस्थेतील रुग्णांसाठी)
- कस्तुरबा रुग्णालय, चिंचपोकळी – ८३ (अति गंभीर अवस्थेतील रुग्णांसाठी)
जानेवारीपासून या विभागांत गोवरचे रुग्ण जास्त आढळून आले
विभाग – रुग्णसंख्या
- एम-पूर्व – ५४
- पी- दक्षिण – २८
- पी-उत्तर – १४
- ई – ८
- एफ-उत्तर – १२
- जी-दक्षिण -३
- एल – २
- एम- पश्चिम – ६
- पी-उत्तर – १४
- एच-पूर्व – १०