सोमवारी अंधेरीतील दीड वर्षांच्या मुलीचा गोवरमुळे मृत्यू झाला. या मुलीला गोवरप्रतिबंधात्मक लसीकरणाचा एकही डोस गेला नव्हता. मुंबईत सोमवारी ११ नवे गोवरबाधित रुग्ण सापडल्याचे पालिका आरोग्य विभागाने जाहीर केले. या मृत्यूमुळे मुंबईत आता गोवरमुळे झालेल्या बालकांच्या मृत्यूची संख्या १४ वर पोहोचली आहे. वाढत्या मृत्यूसत्रामुळे अखेर केंद्राच्या सूचनेनुसार पालिका मुंबईत ६ महिन्यांपुढील बालकांना गोवरप्रतिबंधात्मक अतिरिक्त लसीकरणाची मात्रा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सहा महिन्यांखालील मुंबईतील ३ हजार ४९६ मुलांना या विशेष लशीची मात्रा दिली जाईल.
श्वसनाचा त्रास होऊ लागला
अंधेरीत राहणा-या दीड वर्षाच्या मुलीला जन्मजात हृदयविकाराचा त्रास होता. दोन आठवड्यांपूर्वी तिला हृदयविकाराच्या त्रासामुळे खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले होते. २६ नोव्हेंबर रोजी ताप आणि पुरळ येत तिला अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागला. पालकांनी तिला पालिका रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती गंभीर होत गेल्याने सोमवारी दुपारी दीड वाजता मुलीचा मृत्यू जाला. श्वसनाचा त्रास तसेच गोवर आणि श्वसनाचा न्यूमोनिया झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले.
(हेही वाचा शी जिनपिंग सरकारच्या विरोधात चीनमध्ये असंतोष, विद्यार्थी रस्त्यावर उतरले)
आरोग्य केंद्राची निवड पालिका आरोग्य विभागाने केली
या प्रकरणानंतर ९ महिने ते ५ वर्षांपर्यंतच्या बालकांना गोवर प्रतिबंधात्मक अतिरिक्त लसीकरण मात्रेचा डोस देण्यासाठी ३३ आरोग्य केंद्राची निवड पालिका आरोग्य विभागाने केली. ३३ आरोग्य केंद्रातील १ लाख ३४ हजार ८३३ बालकांना गोवर रुबेला लसीची विशेष मात्रा दिली जाईल. तर ६ महिने ते ९ महिन्यांतील १३ आरोग्य केंद्रातील ३ हजार ४९६ बालकांना गोवर-रुबेलाची विशेष लसीची मात्रा दिली जाईल, असे पालिका आरोग्य विभागाने जाहीर केले. सोमवारी बी, डी आणि डी या तीन विभागांत गोवरचे नवे ११ रुग्ण सापडले. मुंबईत ३०३ गोवरचे रुग्ण आतापर्यंत सापडले आहेत. तर १४ मृत्यूंपैकी केवळ ८ मुंबईतील निश्चित मृत्यू आहेत. तर ३ संशयित मृत्यू आहेत. उर्वरित ३ मृत्यू हे मुंबईबाहेरचे आहेत.
Join Our WhatsApp Community