मुंबईत महिन्याभरात १३ बालकांचा गोवरने मृत्यू झाल्यानंतर आता राज्यातही गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात यंदाच्या वर्षात ६५८ गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. यात लसीकरणापासून वंचित राहिलेल्या वीस वयोगटातील तरुणांचाही समावेश आहे. तर १३ मृत्यूपैकी केवळ एका बालकानेच गोवरप्रतिबंधात्मक लस घेतल्याचे तपासणीअंती आढळून आले. या प्रकरणी राज्यात ५५ ठिकाणी गोवरचा उद्रेक झाल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
गोवर म्हणजे काय?
गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार लसीकरणामुळे टाळता येतो. गोवर प्रामुख्याने पाच वर्षांखालील मुलांना होतो. ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळ्यांची जळजळ, सुरुवातीला चेह-यावर नंतर संपूर्ण शरीरावर लाल, सपाट पुरळ ही आजाराची लक्षणे असतात. गोवरमुळे काही मुलांना अतिसार, कानाचा संसर्ग, न्यूमोनिया, फेफरे, अंधत्व किंवा मेंदू संसर्ग अशी गुंतागुंत होऊ शकते.
(हेही वाचा ‘भारत जोडो यात्रे’त आता ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा?)
गोवर उद्रेक म्हणजे नक्की काय
एका विशिष्ट भागांत चार आठवड्यांच्या कालावधीत ५ किंवा त्यापेक्षा अधिक गोवर संशयित रुग्ण आढळल्यास आणि त्यापैकी किमान दोन रुग्ण प्रयोगशाळा तपासणीत गोवरबाधित आढळल्यास त्याला गोवर उद्रेक असे म्हणतात. यावर्षी राज्यात ५५ ठिकाणी गोवरचे उद्रेक झाल्याची नोंद आहे.
जिल्हानिहाय गोवरबाधित उद्रेक झालेल्या ठिकाणांचा तपशील –
जिल्हा – उद्रेक झालेल्या ठिकाणांची संख्या – संशयित रुग्णांची संख्या – एकूण बाधित रुग्णांची संख्या – मृत्यूची संख्या – बाधित विभाग
- मुंबई – २२ – ३ हजार ८३१ – २६० – १० – गोवंडी, कुर्ला, एच-पूर्व सह एकूण आठ विभाग
- मालेगाव शहर – ११ – ७५७ – ६२ – ० – गोल्डन नगर, गयास नगर, आयएमए हेल्थ पोस्ट, रसजानपूरा, गुरुवार, रविवार विभाग, निमा हेल्थ पोस्ट, संगमेश्वर
- भिवंडी शहर – १० – ४४६- ४६- २ – अंजुरफाटा, गायत्रीनगर, भंडारी कम्पाउण्ड, आझमीनगर, नदी नाका, गैबी नगर, शांतीनगर, मिल्लतनगर, अवचितपाडा, कामतघर गाव
- ठाणे शहर – ५ – ३०३ – ४४ – ० – अतकोनेश्वर, शील आणि कौसा हेल्थ सेंटर, एम.एम.व्हॅली हेल्थ सेंटर,मुंब्रा
- ठाणे जिल्हा – २ – ११७- १५ – ० – भिवंडी
- वसई-विरार – ३ – १६७ – ११ – १ – अचोले हेल्थ सेंटर, आंबेडकर आणि पेलकर शहरी आरोग्य केंद्र
- पनवेल मनपा – १ – १३१ – ५ – ० – खारघर शहरी आरो्ग्य केंद्र
- नवी मुंबई -१ – २१० – १२- ० – पवने आरोग्य केंद्र