राज्यातील गोवरच्या रुग्णांचे निदान करणारे अहवाल हैदराबाद आणि गुजरात येथील प्रयोगशाळेतून येत असल्याने गेल्या चार महिन्यांपासून माहिती मिळण्यास प्रचंड विलंब होत आहे. अद्यापही गोवरचा अहवाल मिळण्यासाठी किमान आठवड्याभराची प्रतीक्षा करावी लागत आहे. या विलंबामुळे गेल्या वर्षातील १२ रुग्णांचा अहवाल शुक्रवारी मिळाल्याचे पालिका आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
डिसेंबर महिन्यातील १२ संशयित रुग्णांच्या अहवालाबाबत शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेला माहिती मिळाली. बरेच अहवाल अजूनही प्रलंबित आहेत. मुंबईत डिसेंबर महिन्याच्या दुस-या आठवड्यापासून गोवर आटोक्यात येऊ लागला होता. १२ रुग्णांचा अहवाल ब-याच काळानंतर उपलब्ध झाला असला तरीही लसीकरण मोहिम जोमाने सुरु असल्याने रुग्णांची स्थिती चांगलीच असल्याचा दावा पालिका आरोग्य विभागातील अधिका-यांनी केला. या रुग्णांना शोधण्याचे काम शनिवारपासून सुरु होईल. १२ रुग्ण मुंबईतील कोणत्या भागांतील आहेत याची सध्या माहिती नाही. गुगल फॉर्मच्या आधारवरच आम्ही रुग्णांची माहिती गोळा करतो. या रुग्णांची माहिती गोळा करण्यासाठीही गुगल फॉर्मचा आधार घेऊन माहिती दिली जाईल, असेही पालिका आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले. १२ पैकी बरेच रुग्ण लसीकरणामुळे बरेही झाले असतील, असा दावा पालिकेच्यावतीने करण्यात आला.
( हेही वाचा: घराघरांत वापरले जाणारे ‘राॅकेल’ गेले तरी कुठे ? )
राज्यात गोवरचा उद्रेक होत असताना आरोग्य विभागाच्यावतीने गोवर टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. राज्यात मुंबई व नागपूर येथे गोवरची निदान करणारी स्वतंत्र प्रयोगशाळा तयार केली जावी असे टास्क फोर्सच्यावतीने सूचवण्यात आले होते. याबाबतील आरोग्यविभागाकडून कोणताही माहिती उपलब्ध झाली नाही.
Join Our WhatsApp Community