मुंबईत कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळेत आता गोवर तपासणी चाचण्या सुरु होणार आहेत. प्रयोगशाळेतील दोन तंत्रज्ञानांचे प्रशिक्षण सुरु असून, फेब्रुवारी महिन्यातील दुस-या किंवा तिस-या आठवड्यात मुंबईतील गोवरच्या नमुन्यांची चाचणी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातच सुरु होईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याचे कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.
गोवरच्या चाचण्यांसाठी राज्यात स्वतंत्र प्रयोगशाळा
मुंबईच्या गोवरमुळे नऊ महिन्यांच्या बालकांमध्ये पुन्हा मृत्यू होऊ लागले आहेत. परिणामी, गोवरच्या वाढत्या केसेसमुळे गोवरच्या केसेस हाताळण्यात आरोग्य विभाग सपशेल अपयशी ठरल्याची टीका राज्य गोवर टास्क फोर्सने व्यक्त केली. गोवरच्या चाचण्यांसाठी राज्यात स्वतंत्र प्रयोगशाळा असावी, अशी सूचना आरोग्य विभागाच्या अधिका-यांना आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केल्या होत्या. त्यावर नाममात्र उपाय म्हणून केवळ पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत आता काही नमुने पाठवले जात असल्याची माहिती आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन आंबडेकर यांनी दिली. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातही गोवरच्या नमुन्यांची तपासणी सुरु झाल्यास तपासणी प्रक्रियेला वेग येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र स्वतंत्र गोवर प्रयोगशाळा तपासणीबाबत वक्तव्य डॉ. आंबडेकर यांनी टाळले.
(हेही वाचा २०२२मध्ये FASTag द्वारे ५० हजार ८५५ कोटींची वसुली; ४६ टक्क्यांनी झाली वाढ)
हैदराबाद आणि गुजरात येथील प्रयोगशाळेत होत
राज्यातील गोवर रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी हैदराबाद आणि गुजरात येथील प्रयोगशाळेत होत आहे. परंतु वाढत्या ताणामुळे अहवाल महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर येत असल्याने स्वतंत्र गोवर तपासणी प्रयोगशाळांचा मुद्दा तातडीने मार्गी लावायला हवा, असा मुद्दा राज्य गोवर टास्क फोर्सने उपस्थित केला आहे. मात्र फोर्सकडून सूचवलेल्या उपायांबाबत आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत वगळता इतरांकडून सकारात्मक प्रतिसाद नसल्याने टास्क फोर्सच्या सदस्यांनी खंत व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community