पक्षाघाताचा झटका आल्यानंतर १५ ते २० तासांचा अवधी निघून गेला असताना मेकेनिकल थ्रोम्बोकटोमी उपचारामुळे महिलेला नवे आयुष्य बहाल करण्यात डॉक्टरांना यश आले. बोरिवली येथील खासगी रुग्णालयात ही किमया घडली. पक्षाघातावर तातडीने उपचार न केल्यास रुग्णाला कायमस्वरूपी अपंगत्व येण्याची भीती असते.
दहिसर येथे राहणाऱ्या ६२ वर्षीय अंजली देवगिरी यांना सकाळी पक्षाघाताचा त्रास झाला. त्यांच्या डाव्या हातापायाच्या हालचाली बंद झाल्या. मात्र पक्षाघाताचे निदान आणि इतर प्रक्रियात १८ ते २० तासांचा अवधी निघून गेला. त्यामुळे रुग्ण कायमस्वरूपी अपंग होण्याची भीती होती. पक्षाघातानंतर रुग्णाला पहिल्या सहा तासात उपचार देणे महत्वाचे असते. वैद्यकीय भाषेत त्याला गोल्डन अवर म्हणतात. त्यानंतर रुग्णावर उपचार परिणामकारक ठरत नाही. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात हृदयरोगानंतर पक्षाघाताचे प्रमाण वाढत आहे.
रुग्ण महिला पक्षाघाताचा झटका आल्यानंतर १८ ते २० तासानंतर रुग्णालयात दाखल झाली होती. त्यामुळे आम्ही महिलेला मेकेनिकल थ्रोम्बोकटोमी उपचार देण्याचा निर्णय घेतला. रुग्णाच्या मेंदूच्या मागील रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी झाली होती. त्यामुळे मेंदतील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होत रुग्णाला पक्षाघाताचा त्रास झाला होता. मेकेनिकल थ्रोम्बोकटोमीमुळे रुग्णाच्या मेंदूतील रक्तप्रवाह सुरळीत झाला. रुग्ण महिला तीन दिवसांनी शरीराची हालचाल करू लागली. आठवड्याभराच्या उपचारानंतर महिलेला डिस्चार्ज दिला गेला.
(हेही वाचा – सायन रुग्णालयात वंध्यत्व निवारणासाठी लवकरच ओपीडी सुरु होणार!)
पक्षाघाताची लक्षणे –
- रुग्णाचे तोंड वाकडे होणे.
- हाता-पायाला लकवा येणे.
- पायातून चप्पल निसटणे.
- बोलताना स्पष्ट उच्चार न जमणे.
- डोळ्यांची दृष्टी हळूहळू कमी होणे.
उपचार –
वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळून आल्यास तातडीने मेंदूविकार तज्ञाकडे संपर्क साधा. बरेचदा रुग्ण पक्षाघाताचा झटक्यापासून वाचतो. डॉक्टर नित्यनेमाने रोजच्या दैनंदिन जीवनात गोळ्यांचे सेवन करण्याचा सल्ला देतात. रुग्णाने वर्षातून किमान एकदातरी डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community