जेजेतील वसतीगृहांच्या दुरावस्थेच्या बातमीच्या दणक्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री जेजेत

भायखळा येथील जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या वसतीगृहाची अवस्था हिंदूस्थान पोस्टने उघडकीस आणून दिल्यानंतर अखेरीस बुधवारी सायंकाळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी जेजे रुग्णालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान महाजन यांनी निवासी डॉक्टरांच्या वसतीगृहाची तपासणी करुन स्वतः आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाचे काम निकृष्ट असल्याने संबंधित ठेकेदाराकडेही महाजन यांनी विचारणा केली. निवासी डॉक्टरांच्या वसतीगृहात बाथरुमच्या व्हरांड्यातच राहणा-या विद्यार्थिनी तसेच विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात कूलर पाण्याच्या टाकीत मच्छरांच्या अंडी असल्याबाबत आपल्याला कल्पना नसून वॉर्डनकडून माहिती घेतली जाईल, असे जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांनी सांगितले.

सोमवारपासून राज्यातील सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी वसतीगृह तसेच इतर मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन पुकारले होते. आंदोलनाच्या दुस-याच दिवशी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेशी चर्चा केली. या चर्चेनंतर डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले. जेजेतील वसतीृहात जागेच्या अभावी डॉक्टरांची कुचंबणा होत असल्याचे हिंदूस्थान पोस्टच्या पाहणीत दिसून आले. अस्वच्छ बाथरुम, बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरा, कूलर पाण्याच्या टाकीत मच्छरांच्या अंडी या भयानक वातावरणात हॉस्टेलमध्ये राहावे लागत असल्याने लॅप्टोस्पायरोसिस, मलेरिया, डेंग्यू या आजारांच्या विळख्यात डॉक्टरांना मानसिक त्रासही सहन करावा लागत होता. याबाबतची माहिती मिळताच बुधवारी गिरीश महाजन यांनी वसतीगृहांना भेट दिल्याचे जेजे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

( हेही वाचा: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आठ दिवसांसाठी बंद; मंदिर प्रशासनाची माहिती )

याआधीही वसतीगृहांच्या प्रश्नासंबंधी महिन्याभरापूर्वी महाजन यांनी जेजे रुग्णालयाला भेट दिली होती. वसतीगृहाच्या डागडुजीविषयी १२ कोटींचा निधी मंजूर झाला असून, निविदा चार ते पाच दिवसांत पूर्ण केल्या जाणार आहेत. वसतीगृहांच्या दुरुस्तीची कामे लवकरच पूर्ण होतील, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी यावेळी महाजन यांना दिले. मच्छरांचे अंडी घालण्याचे ठिकाण झालेल्या पाण्याच्या टाकीसंदर्भात महाजन यांनी घेतलेली भूमिका जेजे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आली नाही. पालिका नियमित पाहणी करत असल्याचा दावा मात्र रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांनी केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here