गोरेगांव येथील नेस्को मैदानावरील मुंबई महापालिकेच्या समर्पित भव्य कोविड आरोग्य केंद्रातील दुसऱ्या टप्प्याचा भाग म्हणून, १ हजार ५०० रुग्ण खाटांचे लोकार्पण राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते एक महिन्यापूर्वी पार पडले. परंतु एक महिन्यानंतर पहिल्या टप्प्यातील सेंटर दुरुस्तीच्या नावाखाली बंद करुन या ठिकाणच्या डॉक्टर, नर्सेस, वार्ड बॉय, आयाबाई यांना कामावरुन कमी करण्यात येत आहे.
एका बाजूला दुसऱ्या टप्प्यात १ हजार १०० मनुष्यबळ नेमण्यात आले असल्याचा दावा प्रशासन करत असून, या पहिल्या टप्प्यातील कमी केलेल्या डॉक्टरसह इतर कर्मचाऱ्यांना चक्क दुसऱ्या टप्प्यातील ठेकेदार निम्म्या पगारात काम करत असाल, तर कामावर ठेऊ असे सांगत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका रुग्ण सेवेसाठी कोविड सेंटर सुरू करत आहे की कंत्राटदारांसाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
म्हणून बंद होत आहे कोविड सेंटर
गोरेगाव नेस्को कोविड केंद्राच्या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण २ हजार २०० रुग्णखाटा कार्यान्वित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये २०० एचडीयू रुग्णखाटा तर ३०० प्राणवायू पुरवठा सुविधा असलेल्या रुग्णखाटा होत्या. दुसऱ्या टप्प्यातील १ हजार ५०० रुग्ण खाटांसह या केंद्राची एकूण क्षमता ३ हजार ७०० रुग्णखाटा इतकी झाली आहे. परिणामी, मुंबईतील कोविड बाधितांवरील उपचारांसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला होता. परंतु आता टप्पा एक मधील कोविड सेंटर येथील डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय, आयाबाई व इतर कर्मचारी वर्ग यांना ३० जून २०२१ रोजी कामावरुन तडकाफडकी कमी करुन टाकण्यात आले. टप्पा एक मधील कोविड सेंटरची दुरुस्ती करण्यात येत असल्याने ते बंद करावे लागणार आहे, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्याकरता ही सेवा खंडित करण्यात येत असल्याचे मेल या कर्मचाऱ्यांना पाठवले आहेत.
(हेही वाचाः दक्षिण मुंबईतील ‘या’ कोविड सेंटरमध्ये वाढणार ७०० ऑक्सिजन खाटा)
कंत्राटदाराच्या मदतीसाठी
एका बाजूला या कर्मचाऱ्यांना कमी करताना टप्पा दोन मधील कंत्राटदार या कर्मचाऱ्यांना सेवेत घ्यायला तयार आहेत. पण सध्या जो काही पगार ते घेत आहेत त्याच्या निम्म्या पगारात काम करावे लागेल, अशी अट घातली जात आहे. विशेष म्हणजे टप्पा एक मध्ये डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय, आयाबाई, जेवण पुरवणे आदींसाठी स्वतंत्र कंत्राटदार होते पण टप्पा दोन मध्ये सर्व प्रकारचे मनुष्यबळ आणि कॅटरिंग सेवा, साफसफाई आदींसाठी एकच कंत्राटदार नेमला आहे. त्यातच टप्पा दोनचे लोकार्पण केल्यानंतर त्यात एकही रुग्ण नव्हता. त्यामुळे त्या कंत्राटदाराला मदत करण्यासाठी दुरुस्तीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
कामावरुन काढून टाकायची गरज काय?
पण कर्मचाऱ्यांना कमी करण्यासाठी त्यांनी डॉक्टर दिनाची निवड केली. त्यामुळे ज्यांनी आपला जीव धोक्यात घालून कोविड रुग्णांची सेवा केली, त्यांना प्रशासनाने असे तडकाफडकी काढून टाकणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया भाजप नगरसेवक पंकज यादव यांनी दिली आहे. टप्पा दोन मधील कंत्राटदाराला मदत करण्याचा प्रशासनाचा डाव आहे. या सेंटरची दुरुस्ती केली जाणार आहे, त्यानंतर एक ते दोन महिन्यांनंतर ते सुरू केले जाणार आहे. मग यांना आता कामावरुन काढून पुन्हा जेव्हा हे सेंटर सुरू करू तेव्हा माणसं भरण्यासाठी प्रयत्न करणार का, असा सवाल त्यांनी केला. ही गंभीर बाब असून जर सेंटर सुरू असेल तर ते दुरुस्त होईपर्यंत त्यांचा पगार चालू ठेवावा आणि सेंटर सुरू झाल्यावर पुन्हा त्यांची सेवा घेतली जावी, अशी सूचना यादव यांनी केली आहे. तसेच त्यांना पाठवलेल्या नोटिसला स्थगिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
(हेही वाचाः कोरोनाच्या संभाव्या तिसऱ्या लाटेसाठी महापालिका सज्ज! काय केली तयारी? वाचा…)
Join Our WhatsApp Community