महापालिका रुग्णालयांना अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी सवड नाही!

मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचारी यांची प्रत्येक वर्षी वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने केईएम, शीव, नायरसह कूपर या रुग्णालयांमध्ये अग्नीशमन कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली जायची. परंतु एकेका कर्मचाऱ्याच्या वैद्यकीय तपासणीसाठी सात ते आठ महिन्यांचा कालावधी महापालिकेच्याच रुग्णालयात लागल्याने अखेर खासगी रुग्णालयात प्रत्येक कर्मचाऱ्यांमागे तीन हजार सहाशे रुपये मोजून वैद्यकीय तपासणी केली जात आहे. त्यामुळे तीन वर्षांसाठी सव्वा दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

४५ वय पूर्ण झालेल्या कर्मचा-यांची तपासणी

काळबादेवी येथील आगीच्या दुघर्टनेनंतर नेमलेल्या सत्यशोधन समितीने केलेल्या शिफारशीनुसार मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचारी यांची प्रत्येक वर्षी वैद्यकीय तपासणी करण्यात यावी अशी शिफारस केली आहे. त्यानुसार २०१५पासून दलातील वयाची ४५ वर्षे पूर्ण झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी केली गेली. २०१५मध्ये वयाची ४५ वर्षे पूर्ण झालेल्या दलातील एकूण १ हजार ३७० अधिकारी व कर्मचारी यांची महापालिकेची नायर,केईएम, शीव तसेच कूपर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली होती.

३ वर्षांकरता ‘इतके’ कोटी करणार खर्च

२०१६-१७मध्ये ही वैद्यकीय तपासणी खासगी रुग्णालयामार्फत करून घेण्यात येत आहे.  ४५ वय असलेल्या कर्मचा-यांसाठी अपोलो क्लिनीक (इंदिरा हेल्थ अँड लाईफस्टाईल प्रायव्हेट लिमिटेड) या खासगी रुग्णालयाची निवड करण्यात आली. या खासगी रुग्णालयात प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी ३ हजार रुपये शुल्क आकारुन त्यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. वैद्यकीय तपासणी दरम्यान उपाशीपोटी रक्ताची तपासणी झाल्यानंतर त्या अधिकारी व कर्मचाऱ्याला आवश्यक तो चहा,नाश्ता, पिण्याचे पाणी आदींची व्यवस्था केली जाते. एका तपासणीसाठी तीन तासांचा अवधी लागतो. विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशीही वैद्यकीय तपासणी केली जात होती.

मात्र ही तपासणी २०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४ मध्येही करण्यात येणार असल्याने ज्या कर्मचाऱ्यांचे जानेवारी २०२१ रोजी वय ३५ वर्षे पूर्ण झाले आहे. असे सुमारे २ हजार कर्मचारी व अधिकारी असून त्यांचीही प्रत्येक वर्षी वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.सध्याच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात तसेच आगीच्या दुघर्टनांचे वाढलेले धोके आणि वाढलेली संख्या आदींमुळे वयाची पस्तीशी पार केलेल्यांचीही वैद्यकीय तपासाणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यासाठी पुन्हा विविध खासगी रुग्णालयांकडून मागवलेल्या दरपत्रिकांमध्ये पुन्हा एकदा अपोलो क्लिनीक या रुग्णालयाने प्रति व्यक्ती ३६०० ते ३९०० एवढ्या दरामध्ये वैद्यकीय तपासणी करून देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी ७२ ते ७८ लाख रुपयांचा खर्च होणार असून तीन वर्षांकरता २ कोटी २२ लाख एवढे रुपये खर्च केले जाणार आहे.

म्हणून करणार खासगी रुग्णालयांकडून तपासणी

महापालिकेच्या केईएम,शीव आणि नायरसह कूपर रुग्णालयांमध्ये या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करताना सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यास सात ते आठ महिन्यांचा कालावधी लागायचा. त्यादरम्यान त्यांना कामावर घेतले जात नव्हते. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांना ओटी देत वाढीव कामे करून घ्यावी लागत होती. २०१६मध्ये ४० वर्षे पूर्ण झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या १५०० एवढी होती. त्यामुळे यासर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यास महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याने, खासगी रुग्णालयांकडून ही वैद्यकीय तपासणी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

 (हेही वाचा : ‘विश्वासघातानं गेलेलं सरकार पुन्हा एकदा आणता येईल’ )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here