रविवारी दिनांक १६ एप्रिल २०२३ रोजी डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी विविध मार्गाने खारघर येथे लाखोंच्या संख्येने भाविक येणार आहेत. त्याचवेळी हार्बर रेल्वेवर नियमित देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मात्र स्वतः सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांशी चर्चा केल्यानंतर येत्या रविवारी १६ एप्रिल २०२३ रोजीचा हार्बर मार्गावरचा मेगाब्लॉक मध्य रेल्वेने रद्द केला आहे.
( हेही वाचा : चुलत भाऊ बनला पक्का वैरी, भावाला बनवले अतिरेकी! मुंबईत दहशतवादी शिरल्याचा केला खोटा कॉल )
यामुळे आता महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना हार्बर रेल्वेने व्यवस्थित प्रवास करता येईल. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या सहकार्याबद्दल मध्य रेल्वेचे आभार मानले आहेत.
मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
- रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत माटुंगा – मुलुंड जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत सुटणाऱ्या जलद मार्गावरील गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.
- ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने पोहोचेल.