खूशखबर…ऑक्टोबरमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, राज्य सरकारमध्ये 78 हजार पदांची जम्बो भरती

143

ऑक्टोबर महिन्यात राज्य सरकारमध्ये विविध पदांसाठी जम्बो भरती होणार आहे. राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये तब्बल 78 हजार पदे भरली जाणार आहेत. विधीमंडळ अधिवेशनात राज्य सरकारच्या माध्यमातून याबाबतची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्या बैठकीत या भरतीसाठीची योजना तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील तरुण-तरुणींसाठी ही सुवर्णसंधी आहे.

15 सप्टेंबरपासून सुरुवात

राज्य सरकारच्या विविध विभागांत रिक्त असलेल्या पदांपैकी पोलिस दलात 7 हजार 231,महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC) द्वारे 11 हजार 26 तसेच गट ब,क आणि ड मध्ये 60 हजारांची पदभरती करण्यात येणार आहे. गृह विभागातील 7 हजार पदांसाठी देखील भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचाः देशाला पैसा पुरवण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा, जीएसटी संकलनात टॉप-3 मध्ये हजेरी)

त्यामुळे एकूण 78 हजारांपेक्षा जास्त पदे भरण्यात येणार असून, येत्या 15 सप्टेंबरपासून या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच डिसेंबरनंतर 25 ते 50 हजार पदभरतीचा दुसरा टप्पा पार पडणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

राज्य सरकारची घोषणा

राज्य सरकारच्या विविध 29 विभागांमध्ये 2 लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. एमपीएससीच्या माध्यमातून 100 टक्के तर अन्य विविध विभागांतील ५० टक्के जागा भरण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी अधिवेशनावेळी विधान परिषदेत दिली होती. त्यानुसार आता या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.