२५ वर्षांवरील सर्वांना लस देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे विनंती!

लसीकरणाचा वेग वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहेच. पण त्यासाठी केंद्राने जास्तीचे डोस देखील द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

117

कोरोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसल्याचे दिसत असून, या वयोगटाला देखील विषाणूपासून वाचवणे आवश्यक आहे. त्यामुळे २५ वर्षांपुढील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे. मध्यंतरी देशातील मुख्यमंत्र्यांसमवेतच्या एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये ४५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी पंतप्रधानांनी मान्य केली होती. पत्रात मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी धन्यवाद देऊन लसीकरण वयोगट आणखी कमी करण्याची विनंती केली आहे. लसींचे वाढीव डोस महाराष्ट्राला मिळावेत, असेही या पत्रात म्हटले आहे.

काय आहे मुख्यमंत्र्यांच्या पत्रात?

मोठ्या संख्येने तरुण वर्ग विशेषत: जो कामानिमित्त घराबाहेर जातो, त्याला लस मिळाल्यास रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे. कोरोना परिस्थिती संदर्भात महाराष्ट्र ठोस पाऊलं उचलत आहे. राज्याने नेहमीच अतिशय पारदर्शकपणे कोरोनाविषयक माहिती मांडली असून, चाचण्यांचा वेगही प्रयत्नपूर्वक वाढवला आहे. प्रत्येक कोरोना रुग्ण बरा झालाच पाहिजे, या निर्धाराने आम्ही उपाययोजना करत आहोत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक हानिकारक असलेल्या विषाणूला रोखण्यासाठी आम्ही ‘ब्रेक दि चेन’ या मोहिमेच्या माध्यमातून, काही कडक निर्बंध लावले आहेत. मात्र यात जीवनावश्यक वस्तू व सेवा, उत्पादन क्षेत्र, वाहतूक सुरुच राहील आणि कोविडसाठी आरोग्याचे नियम सर्वजण पाळतील अशी कार्य पद्धती ठरविली आहे. कोविड लसीकरणास राज्याने अतिशय गांभीर्याने घेतले असून ४ एप्रिल पर्यंत ७६.८६ लाख जणांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. ३ एप्रिल रोजी तर आम्ही राज्यात सर्वाधिक म्हणजे ४.६२ लाख जणांना लस दिली असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळवले आहे.

(हेही वाचाः मुंबईत सुमारे ६२ हजार बाधित रुग्ण, पण गंभीर रुग्ण १ हजार!)

दीड कोटी डोस मिळावेत

लसीकरणाचा वेग वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहेच. पण त्यासाठी केंद्राने जास्तीचे डोस देखील द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या सर्वाधिक संसर्ग असलेल्या ६ जिल्ह्यांसाठी केवळ तीन आठवड्यांत ४५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची आमची तयारी आहे, याकरता दीड कोटी डोसचा पुरवठा महाराष्ट्राला व्हावा, असे त्यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारच्या सहाय्याने आणि राज्य सरकारांच्या प्रयत्नाने या संसर्गाच्या लाटेवर मात करता येणे शक्य होईल, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी आधी जीवन, मग उपजीविका अशा प्राधान्याने आणि विज्ञानाच्या उपयोगाने देशाला एका नव्या सामान्य परिस्थितीत आणता येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.