रेल्वे अपघातावेळी मदतीसाठी धावून गेले भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाचे सदस्य

200

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा वारसा अव्याहतपणे पुढे नेणाऱ्या अनेक संस्थांपैकी एक नाशिकच्या भगूर येथील भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूह आहे. या समूहातील समस्त सदस्यांनी सामाजिक बांधिलकी जपत एप्रिल महिन्यात नाशिक येथे झालेल्या रेल्वे दुर्घटनेवेळी अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी मदतीचा हात दिला. त्यांनी केलेल्या या नि:स्वार्थ कार्यातून मानवतेचे दर्शन झाले.

जेवण पोहोचवण्यासाठी स्वयंसेवकांची होती आवश्यकता

३ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी नाशिकच्या भगूरपासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या देवळाली-लहवित दरम्यान लोकमान्य टिळक – जयनगर (पवन एक्स्प्रेस) एक्स्प्रेसला अपघात झाला. या एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून खाली घसरले. या अपघातात एकाचा मृत्यू तर २२ जण जबर जखमी झाले. ही एक्स्प्रेस मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथून जयनगरला जात असतांना नाशिकच्या भगुरजवळील लहवित स्थानकाजवळ हा अपघात झाला. घटनास्थळी रेल्वे प्रशासनाची वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या ४ रुग्णवाहिका त्वरित दाखल झाल्या. रेल्वे प्रशासनाकडून जखमींना औषधोपचार केल्यानंतर उशिराने नाशिकरोड रेल्वे स्थानकावर ही एक्स्प्रेस दाखल होताच, त्यातील सर्व नागरिकांची रेल्वे प्रशासनाने जेवणाची आणि पाण्याच्या बाटल्यांची मोफत सोय केली होती. यावेळी तेथील गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाला नागरिकांपर्यंत जेवण पोहोचवण्यासाठी स्वयंसेवकांची अत्यंत आवश्यकता होती.

(हेही वाचा – मुंबईला भ्रष्टाचारमुक्त करणार, फडणवीसांची गर्जना)

स्वा. सावरकर समूहाच्या कार्याचे भरभरून कौतुक

रेल्वे अधिकाऱ्यांनी यावेळी रेल्वे प्रशासनाकडून नाशिकरोड रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या क्रांतीतीर्थ भगूर येथील स्वा. सावरकर यांच्या प्रेरणेने भारावलेल्या भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहास संपर्क केला. यावेळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सर्व स्वयंसेवक बंधू घटनास्थळी स्वयंस्फूर्तीने त्वरित दाखल झाले. रात्री १० ते १२.३० वाजेपर्यंत नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर त्या सर्वांनी अत्यंत निष्ठेने आणि सचोटीने मनोज कुवर, प्रशांत लोया, भूषण कापसे, संभाजी देशमुख, संदेश बुरके, खंडू रामगडे, केतन कुवर, गणेश राठोड, संदीप मोरे, संतोष कापसे, मयूर चव्हाण, हर्षद देशमुख आदींनी स्वयंसेवकाची भूमिका बजावली आणि योग्य ते सर्वतोपरी सहकार्य केले. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनीही तिथे उपस्थित असलेल्या आणि तन-मन-धनाने कार्य करणाऱ्या भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या कार्याचे भरभरून कौतुक केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.