राज्यभरातून परतीच्या पावसाचे मार्गक्रमण सुरु झाले, असे वृत्त मागील आठवडाभरापासून वारंवार आले, मात्र पाऊस अजून तरी राज्यातून जायला तयार नाही. याला कारणही तसेच आहे. हवामान खात्याकडून पावसाळ्यात दिला जाणारा इशारा रविवारी पुन्हा महाराष्ट्रासाठी दिला गेला. तो म्हणजे पुढील २४ तासांत राज्यात मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस कोसळणार, असा तो संदेश आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये ‘अरेच्चा! ‘तो’ गेलाच नाही!’, अशी प्रतिक्रिया उमटू लागली आहे.
‘येलो अलर्ट’ जारी!
हवामान खात्याने पुढील ४८ तासांत अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळेल, असा इशारा दिला आहे. त्यासाठी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी सोमवारी, १८ ऑक्टोबर रोजी यलो अॅलर्ट जारी केला आहे. मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. शनिवारी, रविवारीदेखील विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. अमरावतीमध्ये मुसळधार पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले.
(हेही वाचा : साहेब! किती हा भाबडेपणा?, फडणवीसांचा पवारांना टोला)
शेतकऱ्यांसाठी इशारा
आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे काही ठिकाणी तुरळक पावसाची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये परभणी, विदर्भातील चंद्रपूर, अमरावती, ब्रह्मपुरी आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावावी आणि धान्याची काळजी घ्यावी, अशा सुचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.
Join Our WhatsApp Community