मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी अलिकडेच दोन नव्या मेट्रो मार्गिका कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात त्यांचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, मेट्रो-१ ला जोडण्यात आलेल्या या दोन्ही मार्गांवरील प्रवास डोक्याला ताप ठरू लागला आहे. या मार्गावरून प्रवास करण्यासाठी दोनवेळा तिकीट काढावे लागत असल्याने प्रवासाचा वेळ वाढत असल्याचे बहुतांश प्रवाशांचे म्हणणे आहे.
दहिसर ते डीएन नगर मेट्रो २ अ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर ७ या मार्गिका नुकत्याच पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्या आहेत. त्यांची जोडणी घाटकोपर ते वर्सोवा या मेट्रो १ मार्गिकेला दिल्याने रस्ते वाहतुकीवरील भार कमी झाला आहे. मात्र, मेट्रो १ चे व्यवस्थापन आणि उर्वरित दोन्ही मार्गिकांचे व्यवस्थापन वेगवेगळ्या आस्थापनांकडे असल्यामुळे सलग प्रवासासाठी वेगवेगळे तिकीट काढावे लागत आहे.
म्हणजे दहिसर वरून मेट्रोने घाटकोपरला जायचे झाल्यास अंधेरी (पश्चिम द्रुतगती महामार्ग) स्थानकात उतरून पुन्हा तिकीट काढावे लागत आहे. तसाच प्रकार वर्सोवा ते दहिसरदरम्यान पाहायला मिळत आहे. परिणामी तिकिटासाठी दोनवेळा रांगांमध्ये उभे रहावे लागत असल्याने प्रवासाचा वेळ वाढत आहे. इतक्या वेळेत बस इच्छित ठिकाणी पोहोचवत असल्याने नव्या मेट्रो मार्गांवरून जलद प्रवासाचे स्वप्न दिवास्वप्न राहिल्याची खंत मुंबईकरांकडून व्यक्त केली जात आहे.
( हेही वाचा: Tiktok Layoffs: टिकटाॅकमधील सर्व भारतीय कर्मचा-यांना नारळ )
उपाय काय?
या तिन्ही मेट्रो मार्गावरून प्रवासासाठी एकच तिकीट उपलब्ध करून दिल्यास प्रवाशांना होणारा नाहक मनस्ताप टळणार आहे. त्यासाठी एक खिडकी तिकीट योजना अंमलात आणा, अशी मागणी केली जाऊ लागली आहे.
Join Our WhatsApp Community