नववर्षात घ्या हक्काचे घर! म्हाडाकडून ५९९० सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर

म्हाडाने विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरांतील ५ हजार ९९० सदनिकांची सोडत जाहीर केली आहे. त्यानुसार नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. पुणे मंडळाच्या सदनिकांची संगणकीय सोडत १७ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता नेहरू मेमोरियल हॉल येथे काढण्यात येणार आहे.  अशी माहिती म्हाडा पुणे विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने पाटील यांनी दिली.

( हेही वाचा : तुम्हाला माहिती आहे का?, राज्यातील मतदारांची संख्या पोहोचली इतक्या कोटींवर)

नोंदणीकरण, कागदपत्र अपलोड करणे आणि ऑनलाईन पेमेंट यांसारख्या सुविधा या ऍपच्या माध्यमातून सहजरित्या उपलब्ध होणार आहेत. सोडतीत सहभागी होण्याकरिता IHLMS 2.0 ही संगणकीय आज्ञावली अर्जदार अँड्रॉइड (android) अथवा आयओएस (ios) या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिम च्या साहाय्याने आपल्या मोबाईलवर डाउनलोड करू शकतात. अर्जदारांच्या सोयीकरिता  https://housing.mhada.gov.in  या म्हाडाच्या अधिकृत संकेत स्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध  करून देण्यात आली आहे.

म्हाडा पुणे विभागातर्फे अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटातील नागरिकांसाठी या घरांची सोडत होणार आहे. यासाठी नागरिकांना म्हाडाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची आहे. पुणे मंडळाने जाहीर केलेल्या सदनिका विक्री सोडतीत अर्जदार ५ फेब्रुवारी, २०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत सहभाग घेऊ शकतात. त्यानंतर सोडतीत सहभाग घेण्याची लिंक या ऍप वरून निष्क्रिय करण्यात येणार आहे.  दिनांक ०६ फेब्रुवारी, २०२३  रात्री ११.५९ पर्यंत अर्जदार अनामत रक्कमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील. अशाप्रकारे सर्व कागद पत्रांची पूर्तता करणारे अर्जदार या ऍपद्वारे पात्र ठरविले जातील व सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी १५ फेब्रवारी, २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर केली जाणार आहे.

१७ फेब्रुवारी रोजी पात्र अर्जदारांची संगणकीय सोडत जाहीर केली जाणार असून अर्जदारांना सोडतीचा निकाल तात्काळ मोबाईलवर एसएमएस द्वारे , ई-मेल द्वारे तसेच ऍपवर प्राप्त होणार आहे. नूतन सोडत संगणकीय सोडत प्रणालीचा सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे यशस्वी अर्जदारांना आपल्या सदनिकेचे तात्पुरते देकार पत्र पुढील दोन दिवसांतच ऑनलाईन ऍपमध्ये प्राप्त होणार आहे .

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ५९९० सदनिकांपैकी २९०८ सदनिका या प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्त्वावरील असल्याने संगणकीय सोडतीत त्यांचा समावेश असणार नाही.  तसेच  म्हाडा कायद्यातील तरतुदींनुसार प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्त्वावरील सदनिकांची तिसरी सोडत असून पात्रतेचे निकष यांकरिता लागणार नाहीत. अर्जदाराने अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर त्यांना तात्पुरते देकार पत्र  दिले जाईल. सदनिकेची किंमत पूर्ण भरल्यानंतर ताबा प्रक्रिया लगेच सुरु करण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावरील सदनिकांची माहिती म्हाडाचे अधिकृत संकेत स्थळ https://lottery.mhada.gov.in वर मंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या सदनिकांच्या विक्रीकरिता मंडळाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही. त्यामुळे अर्जदाराने कोणत्याही त्रयस्थ /दलाल/ मध्यस्थ व्यक्तीच्या प्रलोभनांना बळी पडू नये. तसेच अशा प्रकारच्या गैरव्यवहारास अथवा फसवणुकीस पुणे मंडळ अथवा म्हाडा जबाबदार राहणार नाही. असे म्हाडाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here