म्हाडाने सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या घरांसाठी आता एकदाच नोंदणी करावी लागणार असून ही नोंदणी कायमस्वरुपी असणार आहे. या नोंदणीच्या आधारे नागरिकांना भविष्यात कोणत्याही मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज करता येणार आहे. ही नोंदणी करताना इच्छुकांना आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावी लागणार आहे. म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी गुरूवार ५ जानेवारीपासून नोंदणीला सुरूवात होणार आहे. म्हाडा सोडत प्रक्रियेतून मानवी हस्तक्षेप टाळून ही प्रक्रिया भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शकपणे राबवण्यासाठी म्हाडाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पात्र अर्जदार सोडतीमध्ये सहभागी होऊ शकतात.
( हेही वाचा : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राणीच्या बागेत पर्यटकांची विक्रमी गर्दी; १३ लाख ७८ हजार ७२५ रुपयांचे उत्पन्न झाले प्राप्त )
एकाच कायमस्वरूपी नोंदणी प्रक्रियेला गुरूवार ५ जानेवारीपासून सुरूवात करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया सकाळी ११ वाजता सुरू होईल. नव्या बदलांनुसार आता नोंदणीधारकांना नोंदणी प्रक्रियेवेळी पॅनकार्ड, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला आणि निवास दाखला सादर करावा लागणार आहे.
नव्या नियमांमुळे काय बदल होणार?
- नव्या बदलांनुसार आता प्रत्येक सोडतीसाठी नोंदणी करण्याची गरज नाही.
- एकदा करण्यात आलेली नोंदणी ही कायमस्वरुपाची असणार आहे.
- या नोंदणीच्या आधारे वर्षानुवर्षे सोडतीसाठी अर्ज करता येणार आहेत.
- नोंदणी केल्यानंतर मुंबई मंडळ, कोकण मंडळ अथवा इतर कोणत्याही मंडळाच्या सोडतीसाठी नागरिकांना अर्ज करणे शक्य होणार आहे.
- नोंदणीधारकाला दर पाच वर्षांनी निवासाचा दाखला सादर करावा लागणार आहे.
- प्रत्येक वर्षी उत्पन्नाचा दाखला, आयकर विवरण पत्र सादर करावे लागणार आहे.
- या नव्या नोंदणीस जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सुरूवात होणार आहे.
- सोडतीच्या APP वरून ही नोंदणी करण्यात येणार असून यासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, निवासाचा दाखला आणि
- उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे ऑनलाईन माध्यमातून सादर करावी लागणार आहेत.