- विशेष प्रतिनिधी, मुंबई
म्हाडा कोंकण मंडळाच्यावतीने बांधण्यात आलेल्या ऑनलाईन लॉटरीमध्ये सदनिकांमध्ये प्रतिसाद न मिळाल्याने आता सदनिकांच्या विक्रीसाठी म्हाडाने कॉर्पोरेट फंडा वापरण्याचा निर्णय घेतला आहे. विक्री न होणाऱ्या सदनिकांची जाहिरात करून सर्वसामान्य व गरीब जनतेला या घरांची माहिती व्हावी यासाठी म्हाडा कोंकण मंडळाने आपल्या अभियंता आणि अधिकारी वर्गाला उतरवण्याचा निर्धार केला असून ऑनलाईन अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विविध २९ ठिकाणी स्टॉल्स उभारण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य तत्वावर विक्री करण्यात येणाऱ्या १४ हजार ०४७ सदनिकांचा समावेश यामध्ये आहे.
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे अत्यल्प, अल्प व मध्यम उत्पन्न गटाकरिता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत विरार-बोळींज, खोणी-कल्याण, शिरढोण-कल्याण, गोठेघर-ठाणे, भंडार्ली-ठाणे येथे विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेल्या सदनिकांच्या विक्रीत वाढ व्हावी व या गृहनिर्माण प्रकल्पांतील सदनिकांबाबत सर्वसामान्य नागरिकांना माहिती व ऑनलाइन अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शनासाठी ०२ ते ११ डिसेंबर २०२४ या कालावधीत व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे, अशी माहिती कोंकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. म्हाडा मुख्यालयातील गुलजारी लाल नंदा सभागृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत गायकर यांच्यासोबत म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे, म्हाडाचे मुख्य अभियंता महेश जेसवानी आदींसह म्हाडाचे अधिकारी उपस्थित होते.
(हेही वाचा – बांगलादेशात दडपशाही सुरुच; ISKCON च्या ५० हून अधिक सदस्यांना भारतात येण्यापासून बांगलादेशाने रोखले)
कोंकण मंडळातर्फे राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेअंतर्गत म्हाडा कोंकण मंडळातर्फे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (First Come First Serve) या तत्त्वावरील विक्रीसाठी उपलब्ध सदनिकांबाबत सर्वसामान्य नागरिकांना माहिती देणे व https://lottery.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज नोंदणी, ऑनलाइन अर्ज सादर करण्याबाबत मार्गदर्शनासाठी ठिकठिकाणी २९ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. या स्टॉल्सवर मंडळाचा एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकांची माहिती सामान्य जनतेला व्हावी यासाठी ठिकठिकाणी माहितीपत्रक वाटप व पथनाट्य सादरीकरण केले जात आहे. म्हाडा कोकण मंडळातर्फे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावरील सदनिकांच्या ऑनलाइन विक्रीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृतीला ११ ऑक्टोबर २०२४ पासून प्रारंभ झाला असल्याचे गायकर यांनी स्पष्ट केले.
वसई विरार महानगरपालिका, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे, पालघर या महानगरपालिकांच्या कार्यालयात सदर स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. तसेच पालघर, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयांत व ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातही मंडळातर्फे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. वसई, उल्हासनगर, पालघर, कल्याण येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात तसेच अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात सदर स्टॉल्स लावण्यात आले आहेत. महापे एमआयडीसी मधील प्रशासकीय अधिकारी कार्यालयातही योजनेबाबत माहिती देणारे स्टॉल्स उभारण्यात आले असल्याचीही माहिती गायकर यांनी यावेळी दिली.
(हेही वाचा – तरुणांनी ‘राष्ट्रप्रथम’ ही भावना मनात रुजवायला हवी; Manjiri Marathe यांचे आवाहन)
विरार येथील जीवदानी देवी मंदिर, विरार चर्च, वसई चर्च या गर्दीच्या ठिकाणी तसेच विरार रेल्वे स्थानक, वसई, ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, वाशी, पनवेल, डोंबिवली, कर्जत, कल्याण या रेल्वे स्थानकांवरही योजनेबाबत माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात आले असल्याचे गायकर यांनी सांगितले. या मोहिमेचा भाग म्हणून १० रिक्षांमधून प्रकल्पांची माहिती दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्रात म्हाडाच्या विक्रीविना पडून असलेल्या सदनिका विक्रीसाठी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या सूचनेनुसार विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सदर मोहीम ही त्याचा भाग असल्याचे सांगून म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे यांनी या योजनेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. या सर्व प्रकल्पांमध्ये २४ तास पाणीपुरवठा, अग्निशमन यंत्रणा, लिफ्ट व कॉमन पॅसेज आहेत. सर्व वसाहतीमध्ये सिवेज ट्रीटमेंट प्लांट, ऑरगॅनिक वेस्ट कन्व्हर्टर उपलब्ध असल्याची माहिती म्हाडाचे मुख्य अभियंता महेश जेसवानी यांनी सांगितले.
(हेही वाचा – उपराष्ट्रपती Jagdeep Dhankhar यांचा महाराष्ट्र दौरा)
काय असणार स्टॉल्सवर?
या प्रत्येक स्टॉलवर मंडळाचा एक कर्मचारी असणार आहे. सदर कर्मचाऱ्यामार्फत प्रधानमंत्री आवास योजनेतील म्हाडा कोकण मंडळाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावरील योजनांची संपूर्ण माहिती, योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती, ऑनलाइन अर्ज नोंदणी करण्याबाबत माहिती व सहाय्य, अर्ज नोंदणीवेळी आवश्यक कागदपत्रांबद्दल माहिती तात्काळ दिली जात आहे. अर्ज नोंदणी करतेवेळी येणाऱ्या अडचणींचे तात्काळ निराकरणही संबंधित कर्मचाऱ्यांमार्फत केले जात आहे. या अडचणींचे निराकरण करण्यासाठी समन्वयाकरिता म्हाडा कार्यालयात एक स्वतंत्र टीम कार्यरत आहे.
शिरढोण कल्याण २७० ड
सदनिकांची संख्या ५३८ (सदनिकेचे क्षेत्रफळ : ३२१.८४ चौ. मी), सदनिका किंमत : १४,९६,९३० रुपये
शिरढोण कल्याण ३८५
सदनिकांची संख्या ५२३६ (सदनिकेचे क्षेत्रफळ : ३२१.८४ चौ. मी), सदनिका किंमत : २०,७२,१४६ रुपये
खोणी कल्याण २७१ ड
सदनिकांची संख्या ११०१ (सदनिकेचे क्षेत्रफळ : ३२१.८४ चौ. मी), सदनिका किंमत : १७,६८,६५८ रुपये
खोणी कल्याण ३८४
सदनिकांची संख्या १०१२ (सदनिकेचे क्षेत्रफळ : ३२१.८४ चौ. मी), सदनिका किंमत : २०,१३,५०० रुपये
खोणी कल्याण २७९ ब
सदनिकांची संख्या ५०८ (सदनिकेचे क्षेत्रफळ : ३२१.८४ चौ. मी), सदनिका किंमत : १७, ६८, ६५८ रुपये
भंडार्ली ठाणे २८० अ
सदनिकांची संख्या ६१३ (सदनिकेचे क्षेत्रफळ : ३११.८४ चौ. मी), सदनिका किंमत : १७,३४,२७१ रुपये
गोठेघर ठाणे २८१ क
सदनिकांची संख्या २२७ (सदनिकेचे क्षेत्रफळ : ३२१.८४ चौ. मी), सदनिका किंमत : १७,,१५, १६४ रुपये
गोठेघर ठाणे ३८६
सदनिकांची संख्या ४७४ (सदनिकेचे क्षेत्रफळ : ३२१.८४ चौ. मी), सदनिका किंमत : २१,३९,०४४ रुपये
विरार बोळींज ३२४ ब (पंतप्रधान आवास योजना)
सदनिकांची संख्या १७४ (सदनिकेचे क्षेत्रफळ : ३२२.८१ चौ. मी), सदनिका किंमत : २१,१५,७०६ रुपये
विरार बोळींज म्हाडा योजनेतंर्गत
सदनिकांची संख्या ४१६४ (सदनिकेचे क्षेत्रफळ : ३२१ ते ६४४ चौ. मी),
सदनिका किंमत : २३,००,००० ते ४६, ००, ००० रुपये
हेही पहा –
Join Our WhatsApp Community