मुंबई-ठाण्यात हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. आता प्रत्येक सामान्य नागरिकांचे गृहस्वप्न पूर्ण होऊ शकते कारण वर्षभरापासूनची म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीची प्रतीक्षा आता संपणार आहे. कोकण मंडळाच्या घरांसाठी लवकरच जाहिरात निघणार आहे. तब्बल ४ हजार घरांची सोडत म्हाडा काढणार आहे.
कोकण मंडळाच्या अंतर्गत ठाणे, नवी मुंबई येथे ही मोक्याच्या ठिकाणी घरे आहेत. सुमारे चार हजार घरांच्या सोडतीसाठी पुढील आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे. घरांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तरी पुढील आठवड्यात घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. सामान्यांना ठाण्यात १५ ते ४४ लाख रुपयांत हक्काचे घर मिळणार आहे. म्हाडा सोडतीच्या नोंदणीस आणि पुणे मंडळाच्या ५ हजार ९९० घरांच्या सोडतीच्या अर्जविक्री आणि स्विकृती अर्जांना गुरूवारपासून सुरूवात झाली आहे.
घर कुठे असणार?
- यातील १ हजार २५० घर ही पंतप्रधान आवास योजनेतील असणार आहेत.
- २४९ घरे ठाण्यातील पाचपाखाडीत रेमंड प्रकल्पातील आहेत.
- अत्यल्प गटासाठी अंदाजे ३०० चौ.फुटाची घरे उपलब्ध होणार असून याची किंमत १५ लाख ५० हजार असणार आहे.
- ठाण्यात पत्रकारांसाठी घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ही खास घरे राखीव असणार आहेत. वर्तकनगर येथे ६७ घरे पत्रकारांसाठी राखीव असून याची किंमत ४० ते ४४ लाखांच्या दरम्यान असणार आहे.