
-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
म्हाडा मुंबई इमारत व दुरुस्ती पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील उपकरप्राप्त, पुनर्रचित इमारती व समूह पुनर्विकास प्रकल्पांचा ‘म्हाडा’ (MHADA) चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन ‘मॅरथॉन’ पाहणी दौरा केला. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या दौर्याचा समारोप सायंकाळी ०५.३० वाजता झाला. या पाहणी दौर्यात मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, सहमुख्य अधिकारी उमेश वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे आदी उपस्थित होते. या भेटीत प्रारंभी मंडळाच्या जी उत्तर विभागातील कलम ९१ अ अंतर्गत भूसंपादित केलेल्या जसोदा को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी, स्वामी समर्थ, आर के बिल्डिंग या इमारतींची जयस्वाल यांनी पाहणी केली. या पाहणीदरम्यान येथील भाडेकरू/रहिवासी यांच्याशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जयस्वाल यांनी या इमारतींचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. (MHADA)
आनंदालय या उपकरप्राप्त इमारतीचा पुनर्विकास रखडला असून या इमारतीच्या विकासकाला कलम ९१ अ अंतर्गत ६ महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, म्हाडाचे (MHADA) उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिलेल्या आजच्या भेटीत या इमारतीच्या रखडलेल्या पुनर्विकासाचे काम मुदतवाढ देऊनही पुन्हा थांबल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत संबंधित विकासकावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. विकास नियंत्रण नियमावली ३३(९) अंतर्गत समूह पुनर्विकास करण्यात येणाऱ्या छपरा, मोहसीन, कुलश्री सीता स्मृती, गणेश, सौदामिनी, मेघ, वरूण, रामभुवन, आकांक्षा, गुरुकृपा, अब्दुल रेहमान, खांडके या १२ उपकरप्राप्त व पुनर्रचित इमारतींना जयस्वाल यांनी भेट देऊन पाहणी केली. या इमारतींच्या समूह पुनर्विकासासंदर्भात बैठक आयोजित करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना जयस्वाल यांनी दिले. या इमारतीतील भाडेकरु/रहिवाशांशी संवाद साधत समूह पुनर्विकासासाठी इमारतीतील रहिवाशांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन देखील जयस्वाल यांनी केले. (MHADA)
(हेही वाचा – नवीन फौजदारी कायदे महाराष्ट्रातील सर्व आयुक्तालयांमध्ये लागू करावे; केंद्रीय मंत्री Amit Shah यांचा आदेश)
शंकर घाणेकर मार्गावरील बैठी चाळ व जनार्दन अपार्टमेंट या खाजगी मालमत्तेचा विकास नियंत्रण नियमावली ३३(९) अंतर्गत समूह पुनर्विकास योजनेत समावेश करण्याच्या सूचना जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दुपारच्या सत्रात मंडळाच्या जी दक्षिण विभागातील खेड गल्ली प्रभादेवी येथील १० इमारती, बोटावाला चाळ, राजाभाऊ देसाई मार्गावरील समूह पुनर्विकास सुरू असलेल्या सात इमारतींची जयस्वाल यांनी पाहणी केली. कादरी मेंशन, साखरबाई धनाजी चाळ, प्रिन्सिपल टीपी प्लॉट, सिद्धी प्रभात जर्सी ए व बी, गणेश निवास या समूह पुनर्विकास सुरू असलेल्या इमारतींचीही त्यांनी पाहणी केली. या इमारतींसंदर्भात तात्काळ बैठक आयोजित करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना जयस्वाल यांनी दिले. जी दक्षिण विभागातील इमारती पाहणी वेळी माजी आमदार सदा सरवणकर उपस्थित होते. (MHADA)
दुपारच्या सत्रात जयस्वाल यांनी म्हाडा मुंबई दुरुस्ती पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील पिरामल मिल संक्रमण शिबिराची पाहणी करत तेथील भाडेकरू तथा रहिवासी यांच्या समस्या जाणून घेतल्या. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठी वेलिंग्टन व्ह्यू हे विश्रामगृह तयार करण्यात येत असून त्याचे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. एम. पी. मिल कंपाऊंड येथे नोकरदार महिलांकरता उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहाच्या ठिकाणी असलेल्या संक्रमण शिबिराच्या दोन इमारतींच्या पाडकामाचे निर्देश जयस्वाल यांनी दिले. जुनी चिखलवाडी येथे भूसंपादित मालमत्तेवर सुरू असलेल्या संयुक्त भागीदारी पुनर्विकास प्रकल्पालाही जयस्वाल यांनी भेट दिली.गोरेगावकर वाडी, कोळीवाडी या उपकरप्राप्त इमारतींचा विकास नियंत्रण नियमावली ३३(७) अंतर्गत पुनर्विकासासाठी प्रस्ताव प्राप्त झाला असून त्याची छाननी लवकर पूर्ण करण्याचे निर्देश जयस्वाल यांनी संबंधितांना दिले. गिरगाव येथील आयुर्विमा महामंडळाच्या मालकीच्या इमारतींनाही जयस्वाल यांनी भेट दिली. याप्रसंगी भाडेकरू/रहिवासी सह झालेल्या चर्चेत इमारतींच्या पुनर्विकासा करिता इच्छुक असल्याचे जयस्वाल यांना सांगितले. (MHADA)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community