म्हाडाचीही ‘लेडिज स्पेशल’!

कार्यालयापासून दूर उपनगरांमध्ये राहावे लागत असल्याने रोजच्या प्रवासामुळे महिलांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. म्हणून ‘म्हाडा’ महिलांसाठी सुसज्ज वसतिगृह उभारणार आहे.

मुंबईत नोकरीसाठी आलेल्या महिलांची राहण्याची सोय व्हावी यासाठी मुंबईतील ताडदेव येथे म्हाडाच्या संक्रमण शिबिराच्या जागेवर म्हाडातर्फे एक हजार महिलांसाठी सुसज्ज वसतिगृह उभारले जाणार असल्याची माहिती, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कार्यालय येणार जवळ!

गृहनिर्माण मंत्री आव्हाड म्हणाले, राज्यशासन नेहमीच विविध सामाजिक उपक्रमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे राज्यभरातून महिला येथे नोकरी करण्यासाठी येतात, मात्र त्यांना कार्यालयाच्या जवळ राहणे शक्य होत नाही. कार्यालयापासून दूर उपनगरांमध्ये राहावे लागत असल्याने रोजच्या प्रवासामुळे त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. ही गरज ओळखून ‘म्हाडा’ अंतर्गत ताडदेव येथील एम.पी.मिल कम्पाउंड परिसरात महिलांसाठी हे सुसज्ज वसतिगृह उभारणार आहे.

(हेही वाचा : टास्क फोर्स काय कागदी घोडे नाचवायला आहे का? काय म्हणाले दरेकर)

अंदाजे 35 कोटी रुपये एवढा खर्च!

मंत्रालय, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, ग्रँट रोड अशा महत्त्वूपर्ण ठिकाणांपासून हे वसतिगृह अगदी जवळ असल्याने मुंबईत नोकरी करणाऱ्या महिलांचा वेळ व प्रवासाचा त्रास वाचणार आहे. 450 खोल्यांचे हे सुसज्ज वसतिगृह साधारणपणे दीड ते दोन वर्षात उभारले जाणार असून येत्या सहा महिन्यांत त्याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू केले जाणार असल्याचेही गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी सांगितले. या कामासाठी अंदाजे 35 कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित असून वसतिगृह उभारल्यानंतर त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम स्वतंत्र संस्था करेल जेणेकरून त्याची गुणवत्ता व सोयीसुविधांवर परिणाम होणार नाही, असेही आव्हाड यांनी सागितले. दरम्यान मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने आता पहिल्यापेक्षा अधिक काळजी घेणे गरजेचे असून नागरिकांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टंन्सिंग व वेळोवेळी हात निर्जंतूक करत राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मुंबई महापालिकाही उभारते वसतिगृह 

मुंबईत या आधीच गोरेगाव येथे मुंबई महापालिकाच्या वतीने नोकरदार महिलांसाठी याआधीच वसतिगृह बांधले जात आहे.  वसतिगृह सात मजली असून एक मजल्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here