रस्त्याचे आयुर्मान वाढण्यासाठी आता नविन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. रस्ता मजबुतीकरणासाठी पृष्ठभागावरील डांबरावर नवीन आवरण चढवण्यासाठी ‘मायक्रो सरफेसिंग’ (Micro Surfacing) या नविन तंत्रज्ञानाचा वापर होत असून पूर्व मुक्त मार्गावर याचा वापर करण्यात आल्यानंतर मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर याचा वापर केला जाणार आहे. मुंबईत तंत्रज्ञानाचा वापर प्रथमच केला जात आहे. या तंत्राचा वापर केल्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये वाहतूक होते पूर्ववत होते. त्यामुळे या तंत्राचा वापर केला जाणार आहे.
पूर्व मुक्त मार्ग (इस्टर्न फ्री वे) देखभाल आणि दुरूस्तीची जबाबदारी सध्या मुंबई महापालिकेची आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मार्फत हा रस्ता महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्यात आला. हस्तांतरणाच्या प्रक्रियेनंतर या अत्यंत महत्त्वाच्या तसेच सातत्याने वर्दळ असलेल्या रस्त्याची योग्य देखभाल आणि दुरूस्ती करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिले होते. त्यानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनखाली रस्ते व वाहतूक विभागाने कामे हाती घेतली. त्यामध्ये प्रामुख्याने, या डांबरी रस्त्याचे आयुर्मान वाढवण्याच्या दृष्टिने ‘मायक्रो सरफेसिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मुंबईत पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे.
(हेही वाचा-IPL 2024 : आयपीएलच्या पुढील हंगामात एका षटकात २ बाऊन्सरना परवानगी )
पूर्व मुक्त मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याची डागडुजी करणे गरजेचे असल्याचे आढळले होते. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवून मायक्रो सरफेसिंगसह (Micro Surfacing) आवश्यक कामांसाठी मे महिन्यात कार्यादेश देण्यात आले होते. मात्र पावसाळ्यात ही कामे करणे शक्य नव्हते. पावसाळा संपल्यानंतर, वाहतूक विभाग व आवश्यक त्या परवानग्या प्राप्त करुन, तसेच वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा रितीने पूर्ण नियोजन करुन टप्प्या-टप्प्यात काम करण्यात येत आहे. अल्पावधीतच ९ किलोमीटरच्या टप्प्याचे काम पूर्ण होवून आता दुसऱ्या बाजुचेही काम वेगाने सुरु आहे. तसेच इतर अनुषांगिक कामे देखील केली जात आहेत, यामध्ये वडाळा व रे रोड येथील उतार मार्गाचा (रॅम्प) देखील समावेश आहे.
महानगरपालिकेने यंदाच्या दिवाळीनंतरच्या कालावधीत, पूर्व मुक्त मार्गावर वाहतूक सुरळीत राहील अशा रितीने नियोजन करुन, दररोज रात्री १२ ते पहाटे ४ या वेळेत, टप्प्या-टप्प्याने भक्ती पार्क ते पी. डिमेलो मार्ग म्हणजे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या बाजुचे मायक्रो सरफेसिंग पूर्ण केले आहे, असे उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी स्पष्ट केले. हे अंतर सुमारे ९ किलोमीटर एवढे आहे. तर दुसऱ्या बाजूचेही सुमारे दीड किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच दुसऱ्या बाजूचेही काम पूर्णत्वास येईल. या तंत्रज्ञानामुळे रस्त्याचे आयुर्मान सुमारे ४ ते ५ वर्षांनी वाढण्यास मदत होणार आहे. कारण आवरणाखाली असलेला डांबराचा थर पर्यायाने संपूर्ण रस्ता सुरक्षित राहतो. या मार्गावर या तंत्रांचा वापर केल्यानंतर आता पूर्व द्रुतगती मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्ग यासह काही महत्वाच्या रस्त्यावर याचा वापर केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
काय आहे ‘मायक्रो सरफेसिंग’ तंत्रज्ञान
पारंपरिक रस्ता पृष्ठीकरण करताना, रस्त्यावरील डांबराचा संपूर्ण (सुमारे ६ इंच) थर काढून पूर्ण नवीन थर टाकला जातो. तर, ‘मायक्रो सरफेसिंग’ मध्ये, डांबराचा रस्ता खराब होवू नये म्हणून त्यावर सुमारे ६ ते ८ मिलीमीटरचे मजबूत असे आवरण केले जाते, हा मुख्य फरक आहे. मायक्रो सरफेसिंगद्वारे एका दिवसात सरासरी १ किलोमीटरच्या रस्त्याचे मजबुतीकरण करणे शक्य होते. यामध्ये, बाइंडर, सिमेंट, इमल्शन, पाणी, खडी आदींचे योग्य मिश्रण मशीनच्या सहाय्याने तयार करुन, संयंत्रांच्या सहाय्याने रस्त्यावर टाकण्यात येते. त्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये वाहतूक पूर्ववत सुरू करणे शक्य होते.
Join Our WhatsApp Community