मुंबई महापालिका शाळांमध्ये मध्यान्ह भोजन उपलब्ध करून दिले जात असले तरी हे भोजन पोषक आहार असायला हवे, याची काळजी आता महापालिका प्रशासनाकडून घेतली जात आहे. यासाठी मुंबईतील शाळांना मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या १५०हून अधिक संस्थांच्या अध्यक्षा व सचिवांची बैठक घेऊन त्यांना योग्यप्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले. यात महानगरपालिकेच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना भाजीपाल्याचा समावेश असलेला चविष्ट आणि दर्जेदार पूरक आहार उपलब्ध करुन देण्यासाठी यावेळी महिला संस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. (Mumbai Municipal Schools)
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अधिकाधिक गुणवत्तापूर्ण आहार देण्यासाठी शिक्षण विभागाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येतात. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आहार मिळावा म्हणूनच केंद्रीय स्वयंपाकगृह चालवणाऱ्या संस्थांचे प्रशिक्षण शिक्षण विभागामार्फत आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना पूरक आहार देण्यात यावा हे प्रशिक्षणाचे उद्दिष्ट होते. (Mumbai Municipal Schools)
मुंबईतील १६० महिला संस्थांचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या उपस्थितीत दादरच्या वूलन मील महानगरपालिका शालेय सभागृहात हे प्रशिक्षण पार पडले. महानगरपालिका शाळांमध्ये मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी सहआयुक्त (शिक्षण) डी. गंगाथरण, शिक्षण अधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, उपशिक्षण अधिकारी (पूर्व उपनगरे) कीर्तीवर्धन किरतकुडवे, उपशिक्षण अधिकारी (प्रधानमंत्री पोषण योजना) अजय वाणी, उपशिक्षण अधिकारी निसार खान, सर्व प्रशासकीय अधिकारी (शाळा) आणि मुंबईत कार्यरत असलेल्या १६० महिला संस्थांचे अध्यक्ष, सचिव आदी या बैठकीला हजर होते. यावेळी केंद्रीय स्वयंपाकगृह चालवणाऱ्या संस्थांना पूरक आहाराबाबत प्रशासनामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. (Mumbai Municipal Schools)
(हेही वाचा – Shalini Thackeray : एकनाथ शिंदे, अजित पवार असे अनेक तयार होतील; पण राज ठाकरे एकमेवाद्वितीय!)
महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना पोषणमूल्य युक्त व चविष्ट आहार पुरवण्याची जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी, असे निर्देश सहआयुक्त (शिक्षण) डी. गंगाथरण यांनी केंद्रीय स्वयंपाकगृह संचालन करणाऱ्या संस्थांना दिले आहेत. या संस्थांना महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत प्रशिक्षण देण्यात आले, यावेळी त्यांनी सूचना केल्या. ते म्हणाले, शासनाने निश्चित केलेल्या पाककृतीनुसार आवश्यक धान्य आदी साहित्य, मसाले, तेल व भाजीपाला उपयोग करून चविष्ट, दर्जेदार आणि पोषणमूल्य आहार विद्यार्थ्यांना दररोज प्राप्त होईल, याची दक्षता घ्यावी असे निर्देश गंगाथरण यांनी दिले. (Mumbai Municipal Schools)
विद्यार्थांना दररोज आहार पुरवठा होईल, या बाबीची संस्थांनी काळजी घ्यावी. आठवड्यातील प्रत्येक बुधवारी निश्चित करण्यात आलेला पूरक आहार देण्यात यावा. प्रति विद्यार्थी निश्चित केलेल्या प्रमाणात शिजवलेला आहार पुरवठा करण्यात यावा. कोणताही विद्यार्थी आहारापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी, तांदुळ, धान्य, भाजीपाला आणि इतर बाबी स्वच्छ करून आहारासाठी वापराव्यात, अशा सूचना सहयुक्तांनी दिल्या. प्रशिक्षणादरम्यान महिला संस्थांना त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी संधीही देण्यात आली. महिलांच्या अडचणींवर मार्गदर्शन केल्याची माहिती शिक्षण अधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ यांनी दिली. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत ज्या तक्रारी प्राप्त होत आहेत, त्याची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे कंकाळ यांनी सांगितले. (Mumbai Municipal Schools)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community